रणदीप हुड्डाची मुख्य भूमिका असलेला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट गेल्या शुक्रवारी म्हणजेच २२ मार्च रोजी हिंदी व मराठी भाषेत प्रदर्शित झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आज हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर रणदीप हुड्डाचं त्यांनी तोंडभरून कौतुक केलं. तसंच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर त्यांनी टीका करून त्यांना खास ऑफर दिली आहे.

मुंबईत आज मराठी भाषेतील चित्रपटाचं खास स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. यावेळी अभिनेता रणदीप हुड्डा, अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. चित्रपट पाहून झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “मी रणदीप हुड्डांचं मनापासून अभिनंदन करेन. त्यांनी सावरकरांवर सत्य सांगणारा सिनेमा आणला. काँग्रेसी आणि डाव्या विचारसरणीच्या इतिहासकारांनी सर्वांत जास्त अन्याय स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केला. परंतु, त्यांची खरी कहाणी या सिनेमाच्या माध्यमातून रणदीप हुड्डांनी आपल्यापर्यंत आणली. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो मराठीतही आणला. मी सर्वांना आवाहन करतो की देशाचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर हा सिनेमा बघितलाच पाहिजे.”

“स्वातंत्र्यवीर सावरकारांचं चरित्र ३६० अंशात आहे. अत्यंत बुद्धीमान व्यक्ती, लिडर आणि नीडर स्वातंत्र्यसेनानी, समाजसेवक, जातीप्रथेच्या विरोधात लढणारे सुधारक, मराठी भाषेला समृद्ध करणारे साहित्यिक असे अनेक कंगोरे आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सामान्य माणसाला प्रेरणा तर दिलीच, त्यासोबत भारतीय संस्कृती, हिंदुत्व, यासह काही चुकीच्या संकल्पना होत्या त्या समाजासमोर आणण्याचाही प्रयत्न केला”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा >> बारामतीसाठी उमेदवारी जाहीर होताच सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिया; म्हणाल्या “जनतेने…”

“आजच्या कमर्शिअल युगात असा सिनेमा बनवण्याची संकल्पना विलक्षण आहे. रणदीप हुड्डा आणि अंकिता लोखंडे यांनी या दोन्ही भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. आपण त्या कालखंडात पोहोचलो आहोत असं वाटतं”, असं देवेंद्र फडणवीस या सिनेमाचं कौतुक करताना म्हणाले.

राहुल गांधींना खास ऑफर

“राहुल गांधी हा सिनेमा पाहायला येत असतील मी संपूर्ण थिएटर बूक करेन आणि त्यांना एकट्याला हा सिनेमा पाहण्याची व्यवस्था करेन. राहुल गांधींनी सावरकर वाचले नाहीत. म्हणून त्यांना सावरकर कळले नाहीत. त्यामुळे ते सावरकरांविरोधात गरळ ओकत असतात. मी निश्चित रुपात त्यांना आवाहन करतो की राहुल गाधींनी सावरकर हा सिनेमा पाहावा. ते सिनेमा पाहू इच्छितात तर मी माझ्या खर्चाने त्यांना सिनेमा पाहण्यासाठी संपूर्ण थिएटर बूक करेन”, अशी खास ऑफरही देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना दिली.