Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपासून महाराष्ट्रधर्म हा नवा पॉडकास्ट सुरु केला आहे. आपल्या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती उलगडून सांगितली. रामायण महाभारतापासून गौतम बुद्धांपर्यंतचे संदर्भही थोडक्यात सांगितले. धर्म आणि अधर्माचा लढा आपल्या महाराष्ट्रातच उभा राहिला होता असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं?
” महाराष्ट्र हा महाराष्ट्र का आहे याचं उत्तर शोधायचं असेल तर मागे जावं लागेल. महाराष्ट्राची कहाणी सुरु होते ती देवांच्या पावलांनी. वनवासात असताना प्रभू रामांनी दंडकारण्यात प्रवेश केला. आजच्या विदर्भात आणि नाशिकच्या भागात घनदाट जंगलाचा विस्तार होता. पंचवटी हा पुराणातला शब्द आहे तर तो रामायणातल्या जिवंत भुगोलाचा भाग आहे. हेच ते ठिकाण जिथे लक्ष्मणाने लक्ष्मणरेषा काढली. जिथे रावण साधूवेशात आला आणि सीतामाईला पळवून घेऊन गेला. धर्म आणि अधर्माचा संघर्ष उभा राहिला तो इथेच. कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नाशिकला गेलो होतो तेव्हा हा इतिहास माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला. सत्याचा जय होत असतो हे राम रावणाच्या युद्धाचं सार आपण सांगत आलो.
महाभारतातही महाराष्ट्राचीच भूमी आहे
महाभारतातही महाराष्ट्राचीच भूमी आहे. विदर्भात दमयंती होऊन गेली. कोकणातील गुहांमध्ये अर्जुन तप करत होता हे लोककथा सांगतात. त्याला दिव्यास्त्र मिळाली. महाभारतातल्या रमणीय कथेचा भाग विदर्भात घडला आहे. राजकन्या रुक्मिणीने कृष्णाला पत्र लिहिलं होतं. हे पत्र वाचताच तो धावत येतात. आजची तरुण मुलं मेल करतात. मात्र कित्येक शतकांपूर्वी रुक्मणीने पत्र पाठवलं. पत्र मिळाल्यावर कृष्ण पोहचले आणि त्यांनी रुक्मिणीची सुटका केली आणि तिला घेऊन गेले. हे देखील विदर्भाच्या भूमीत घडलं आहे. पांडव वनवासातील अज्ञातवासात राहिले ते चिखलदऱ्यात येऊन. जुलमी किचकाची राजवट उलथवून लावली ती इथेच. महाराष्ट्राची भूमी पुराणांमध्येही आहे.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राने गौतम बुद्धांचे शब्द आपल्या कृतींनी जपले आहेत- फडणवीस
भगवान बुद्धही शांततेच्या माध्यमातून इथे आले. अजिंठ्याच्या डोंगररांगांमध्ये लेण्यांमध्ये कोरल्या. महाराष्ट्राने भगवान बुद्धांचे शब्द फक्त ऐकले नाहीत त्यांना जपलं ते कृतींमध्ये. सत्याचा, विश्वाचा शोध घेणारे साधक इथे निर्माण झाले आणि ते इथे रमलेही. शंकराचार्य अवघ्या आठव्या वर्षी घर सोडून भारतभर फिरले. चिदानंद रुपम शिवोहम हे त्यांचं पीठ करवीर इथेच स्थापन केलं. महाराष्ट्र हा उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणारा दुवा आहे. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
वारीची परंपरा आपल्या महाराष्ट्रातच आहे-फडणवीस
वारीची परंपरा ही आपल्या महाराष्ट्रातच आहे. जी प्रतिवर्षी न चुकता भक्तीवर आधारित असलेली सामाजिक समतेचा झरा बनली आहे. वारीमध्ये जातीभेदाला थारा नाही. काहीही विचारांमध्ये घेतलं. एकमेकांना भेटलेले यात्री हे विठ्ठलाच्या ओढीने पंढरपूरला जातात. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी किशोर वयात लिहिली पसायदान ही जागतिक संस्कृतीतली सर्वात मोठी प्रार्थना आहे. मुक्ताबाईंच्या ओव्या या समाजाला प्रश्न विचारण्यामध्ये ताकदवान ठरतात. संत एकनाथ यांच्या अभंगांनी करुणा आणि नैतिकतेचा झरा वाहिला. संत चोखा मेळा यांना मंदिरात प्रवेश मिळाला नाही पण त्यांची समाधी आज पंढरपूरच्या दारात आहे. शस्त्र हाती न घेणारे हे सगळे योद्धेच होते. एकदा एक वारकरी सांगत होता की माझ्या आजोबांनी सांगितलं होतं. राम प्रभू एका झाडाखाली थांबले होते. त्यांनी सीतेसाठी फुलं तोडण्यासाठी हात वर केला तेव्हा झाडांनी स्वतःहून फुलं झाडून दिली. ही गोष्ट कल्पनेतून आलेली नाही ही स्मरणातून आली आहे. आज हजारो वर्षांनीही नदीघाट विठ्ठल विठ्ठलच्या गजराने दुमदुमतो. वारी म्हणजे कुठलाही इव्हेंट नाही ही चालतीबोलती संस्कृती आहे, एक अखंड स्मृती आहे. हजारो वर्षांपूर्वी परकिय आक्रमणांना न जुमानता पावलं चालत राहिली. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.