मी मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचे आभार मानतो की आपण शपथविधीनंतर मला निमंत्रित केलं आणि आपण सर्वांनी माझं स्वागत केलं आणि सत्कार केला याबद्दल मी आभार मानतो. आपला हा संघ राज्याच्या संपूर्ण लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ आहे. विधीमंडळातून राज्याचा कारभार चालतो तो योग्य प्रकारे चालला आहे की नाही हे सांगण्याचं काम तुम्ही सगळे करत असता असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. चुका झाल्यास ती निदर्शनास आणून देता, कधी कधी अशाही गोष्टी असतात की ज्या आम्हाला माहीत नसतात त्या जनतेपर्यंत पोहचतात, त्यानंतर आम्हाला या सगळ्यावर उत्तर द्यावं लागतं.

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातलं सरकार गतिशील सरकार होतं-देवेंद्र फडणवीस

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार हे गतिशील असं सरकार होतं. आज आमची जी जाहिरात होती की महाराष्ट्र आता थांबणार नाही. त्याबाबत मला विचारलं की महाराष्ट्र आता थांबणार नाही म्हणजे काय त्यावर मी सांगितलं की महाराष्ट्राच्या विकासाने मागच्या अडीच वर्षात गती घेतली आहे. ही गती आता तशीच पुढे नेऊ. आता महाराष्ट्र थांबणार नाही. पायाभूत क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, उद्योग क्षेत्र प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रणी राहिल असं मी आपल्याला सांगू इच्छितो असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आमच्या भूमिका बदलल्या आहेत पण..

महायुतीतल्या आमच्या भूमिका बदलल्या आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, मी आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री होतो. २०१९ ला ७२ तासांसाठी मी आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होतो. आता पुन्हा मी मुख्यमंत्री आहे आणि अजित पवार, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. आमचे रोल बदलले असले तरीही दिशा ती राहणार आहे, गती तिच राहणार आहे. आमची जी पहिली मंत्रिमंडळाची बैठक झाली त्या बैठकीत आम्ही तिघांनीही अधिकाऱ्यांना सांगितलं की मागच्या काळात आम्ही आलो तेव्हा ५० ओव्हरची मॅच होती, अजित पवार आले तेव्हा २०-२० ची मॅच झाली, आता टेस्ट मॅच आहे त्यामुळे सगळे निर्णय योग्यपणे घेऊन आणि पुढची पायाभरणी योग्य प्रकारे करत आपल्याला वाटचाल करायची आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- Devendra Fadnavis : अखेर फडणवीस पुन्हा आले! सोशल मीडियावर #ToPunhaAala होतंय ट्रेंड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्या योजना जाहीर केल्या त्या सुरुच राहणार आहेत-फडणवीस

विविध निर्णय आम्ही जे आधी घेतले होते ते पुढे सुरुच ठेवायचे आहेत. तसंच आमचा प्रयत्न हाच आहे जी आश्वासनं आम्ही दिली होती ती सुरुच ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. मी जनतेला आश्वस्त करु इच्छितो की लोकाभिमुख सरकार, सगळ्या समाजांना बरोबर घेऊन चालणारं सरकार महाराष्ट्रात असेल. अडचणी येतात पण अडचणींवर मात करत आपण वाटचाल करतो. मी आपल्या सगळ्यांचीही या प्रयत्नांमध्ये साथ मागतो आहे. आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेला हे आश्वस्त करु इच्छितो की हे सरकार पारदर्शीपणे आणि जनतेसाठी काम करणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.