महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून मराठवाड्या दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती सरकारने दिलीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. शिवाय कर्जमुक्ती नाही तर मतदान नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घ्यावी असं आवाहनही उद्धव ठाकरेंनी केलं. तसंच देवेंद्र फडणवीस यांना टोलाही लगावला. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोमणे मारण्याशिवाय काहीच येत नाही असं म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी-उद्धव ठाकरे

आपलं युतीचं सरकार आलं यांनी जाहीर केलं छत्रपती महाराज शेतकरी कर्जमाफी योजना आणली. मला कुणी ढ म्हणू द्या, अडाणी म्हणू द्या पण मी अभ्यास न करता दोन लाखांपर्यंतचं पीक कर्ज माफ केलं होतं. आता जे मुख्यमंत्री आहेत ते पंचांग काढून बसले आहेत. राहु कुठे आहे केतू कुठे आहे? ते बघत आहेत. त्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी आहे. कालच बिहारमध्ये बसता बसता पडले, पडता पडता बसले तो भाग वेगळा. आता त्यांनी मुहूर्त काढला आहे पुढच्या वर्षीच्या जूनचा. जूनमध्ये कर्जमुक्ती करणार असतील तर आत्ताच्या कर्जाचे हप्ते भरायचे की नाही? कर्जमुक्ती होणार असेल तर हप्ते का भरायचे? सगळ्या कर्जाची माफी जूनमध्ये होणार आहे का? असे प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारले आहेत.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

निवडणुकांची घोषणा झाली आहे. आम्ही त्या निवडणुकांना सामोरे जाऊ. तिन्ही पक्ष आपल्या आपल्या स्तरावर निर्णय घेतील. काही ठिकाणी युती झाली नाही तरीही आम्ही नंतर एकत्र येऊ. महायुतीला जनता कौल देईल. उद्धव ठाकरे पहिल्यांदा घराच्या बाहेर पडले आहेत ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे मला आनंद आहे. उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलिकडे काही करु शकत नाही. मी तर यापूर्वीही सांगितलं आहे की विकासावर केलेलं एक भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा. असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. दरम्यान राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर जी टीका केली त्याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंबाबतही भूमिका मांडली आहे.

राज ठाकरेंना एकच उत्तर हवं आहे निवडणुका पुढे ढकला ते मिळू शकत नाही-देवेंद्र फडणवीस

राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर टीका केली. याचं कारण त्यांना एकच उत्तर हवं आहे की निवडणुका पुढे ढकला. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणुका काही पुढे ढकलता येणार नाहीत. त्यामुळे त्यांना अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.