राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी नुकतंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळं अवघ्या राज्यात विरोधक आक्रमक झाले होते. आज सकाळीच पिंपरीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध पक्षांनी आंदोलन करून पाटील यांचा निषेध केला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमध्येच त्यांच्यावर शाईफेकीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवर भाजपाकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – चंद्रकांत पाटलांवर शाईफेकीच्या घटनेवर भाजपाची पहिली प्रतिक्रिया, ‘यामागे कोणाचा मेंदू…’

नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अतिशय दुर्दैवी अशाप्रकारची गोष्ट आहे. खरं म्हणजे त्यांच्या वाक्यातला एखादा शब्द चुकला असेल, तर त्या वाक्याचा आशय घेतला पाहिजे. माध्यमांनाही माझी विनंती आहे, की पूर्ण वाक्य दाखवून वाक्याचा आशय न दाखवता केवळ चुकलेल शब्द दाखवणं हे योग्य नाही. अर्थात मी काही माध्यमांना दोष देत नाही. पण मला असं वाटतं जे लोक अशा प्रकारचं कृत्य करत आहेत, आंदोलन करत आहेत. त्यांनी ते वाक्य नीट ऐकलं पाहिजे, त्याचा आशय समजून घेतला पाहिजे. जो खटकणार शब्द आहे, त्याबद्दल त्यांनी खुलासाही केला आहे, माफीही मागितली आहे, सगळं केलं आहे त्यानंतरही अशाप्रकारे लक्ष्य करणं हे अतिशय चुकीचं आहे.”

याशिवाय, “चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य एवढच होतं, की आज लोक अनुदानाच्या मागे लागतात पण त्या काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा कर्मवीर भाऊराव पाटील असतील यांनी सरकारी अनुदानाच्या मागे न लागता, जनतेतून पैसा उभा करून शिक्षणाची व्यवस्था उभी केली. त्यामुळे मला असं वाटतं हा आशय लक्षात घेतला पाहिजे आणि अशाप्रकारे चुकीच्या पद्धीतने लक्ष्य करणं हे अतिशय अयोग्य आहे.” असंही फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.

हेही वाचा – ‘फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली’ या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपा नेते आणि राज्याचे वने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले की, “मला वाटतं ही राजकीय दुर्दैवी घटना आहे. चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भात दिलगिरी व्यक्त करताना, त्यांचा आशय काय होता, ही स्पष्ट भूमिका घेतल्यानंतर मुद्दाम असा प्रकार करणं हे भविष्यात राजकारणात असे प्रकार मग वाढण्याची शक्यता आहे.” टीव्ही 9 शी ते बोलत होते.