लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : शारदीय नवरात्रौत्सवानंतर अवघ्या पाच दिवसांनी आलेल्या कोजागिरी अर्थात अश्विनी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी सोलापूरसह शेजारच्या कर्नाटक सीमेवरील लाखो भाविक अनवाणी पायी चालत तुळजापूरकडे रवाना झाले. अबालवृध्द भाविकांच्या गर्दीने तुळजापूरचा संपूर्ण मार्ग फुलून गेला होता. या मार्गावर भक्तीच्या विराट शक्तीचे दर्शन घडले.
नवरात्रौत्सवाच्या अखेरच्या पर्वात विजयादशमीला तुळजापुरात तुळजाभवानी माता निद्रिस्त होते. त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेला तुळजाभवानी माता निद्रिस्त अवस्थेतून पुन्हा जागी होऊन भक्तांना दर्शन देण्यासाठी सज्ज होते. त्यानिमित्ताने कोजागिरी पौर्णिमेला तुळजाभवानी मातेच्या दर्शनाची आस घेऊन लाखो भाविक अनवाणी पायी दूर अंतरावरची वाट तुडवत तुळजापूरला जातात. गेल्या दोन दिवसांपासून सोलापूरमार्गे तुळजापूरकडे जाणा-या भाविकांची गर्दी होती. शनिवारी, कोजागिरी पौर्णिमेला दुपारपासून तुळजापूरच्या मार्गावर भाविकांच्या गर्दीने भक्तीचा महापूर ओसंडून वाहात होता. ‘ आई राजा उदो उदो’ चा गजर करीत, देवीची गाणी म्हणत भाविक वाट तुडवत तुळजापूरच्या दिशेने जात होते.
आणखी वाचा-तुळजापूर : कोजागिरीच्या उत्सवाने नवरात्रोत्सवाची सांगता, मनाच्या काठ्या होणार दाखल
सोलापूर जिल्ह्यातील जवळपास सर्व तालुक्यांसह शेजारच्या कर्नाटकातील विजापूर, बागलकोट, कलबुर्गी, गदग आदी दूरच्या भागातून अबालवृध्द भाविकांचे जत्थे पायी चालत तुळजापूरकडे जात होते. कोजागिरी पौर्णिमेला तुळजापूरला पायी चालत जाण्याची ही परंपरा केव्हापासून सुरू झाली, याची माहिती नसली तरी त्यातून भक्तीचे विराट शक्ती दर्शन घडते.
तुळजापूरच्या रस्त्यावर भाविकांच्या सेवेसाठी अनेक सेवाभावी सामाजिक संस्थांनी सेवा केली. अल्पोपहारासह फळे, पाणी, सरबत इत्यादी स्वरूपात भाविकांची सेवा केली जात होती. काही संस्थांनी भाविकांसाठी वैद्यकीय शिबिरेही आयोजिली होती.