भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्याविषयी बोलताना राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी अर्वाच्च भाषेत टीका केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्याविरूद्ध परळी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, “आपल्याला संपवण्याचा प्रयत्न होत आहेत. मी कधीही बहिणीला उद्देशून असं बोललो नाही. ते लोकांसाठी होतं. नव्या आलेल्या भावांनी आमच्या नात्यात विष कालवलं असून, मला जग सोडून जावं वाटत आहे,” असं सांगत धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सर्व आरोप फेटाळून लावले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धनंजय मुंडे यांच्या १७ तारखेला विडा येथे झालेल्या भाषणाची एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यातील धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडे यांच्या समर्थकांकडून संताप व्यक्त केला जात असताना, धनंजय मुंडे यांनी रविवारी दुपारी परळी येथे पत्रकार परिषद घेऊन त्या वक्तव्यावर भूमिका मांडली. वक्तव्यावरून झालेल्या आरोपावर बोलताना मुंडे भावूक झाले. ते म्हणाले, “माझ्या मागे कुणाचं नाव नव्हतं, लोकांची कामं करून लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं. स्वतःच्या कर्तृत्वानं नायक झालो, पण आता खलनायक करण्याचा प्रयत्न केला जातोय. मी कधीही कुणाचं मन दुखावेल असं बोललो नाही. मतांच राजकारण कधीच केलं नाही. ज्या बहिणीसाठी मी हा मतदारसंघांचा त्याग केला होता. मी नाती कशी सांभाळतो हे जनतेला माहिती आहे. मात्र, नव्यानं आलेल्या भावांनी आमच्या नात्यात विष कालवण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मी ते बहिणीसाठी नाही, तर जनतेसाठी बोललो होतो. कालचा वाद वेदनादायी असून आता जग सोडून जावं असं वाटत आहे,” असं सांगतांना धनंजय मुंडे भावूक झाले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhananjay munde rejected all allegations about his remarks bmh
First published on: 20-10-2019 at 12:57 IST