Dhananjay Munde : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून चांगलंच राजकारण तापलेलं आहे. यातच काही दिवसांपूर्वी कुणबी नोंद असलेल्या मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने २ सप्टेंबर रोजी अध्यादेश काढला. या अध्यादेशामुळे ओबीसी आक्रमक झाले आहेत. सरकारच्या अध्यादेशामुळे ओबीसींवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा गंभीर बनलेला असतानाच लातूरमधील भरत कराड नावाच्या युवकाने आत्महत्या करत टोकाचं पाऊल उचललं. त्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, मंत्री छगन भुजबळ आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी नुकतीच भरत कराडच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केलं. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं असून भरत कराडच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची मदत देण्याची आणि कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याची मागणी केली आहे.

धनंजय मुंडेंनी काय म्हटलं?

“ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आल्याचं नैराश्य मनात बाळगून आत्महत्या केलेल्या स्व. भरत महादेव कराड (रा. वांगदरी, ता. रेणापूर, जि. लातूर) यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारच्यावतीने २५ लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत पात्रतेनुसार नोकरी मिळवून द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. स्व. भरत कराड यांच्या पश्चात कुटुंबात आई-वडील, पत्नी, भाऊ, तीन मुली व एक मुलगा असा मोठा परिवार असून त्यांच्या या बलिदानाने उघड्यावर पडलेल्या या कुटुंबाला राज्य सरकार न्याय देईल, असा विश्वास आहे.”

“भरत कराडचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही”, भुजबळ

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगदरी या गावातील भरत महादेव कराड (३५) या व्यक्तीने ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, आज (१२ सप्टेंबर) राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी वांगदरी या गावी जाऊन भरत कराड यांच्या कुटुंबाचं सांत्वन केलं. तसेच यावेळी भुजबळ यांनी कराड यांच्या गावात जमलेल्या लोकांना संबोधित केलं.

भुजबळ म्हणाले, “आम्ही भरतचं हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. आम्ही आरक्षण टिकवण्यासाठी पूर्ण ताकदीने लढू. आरक्षण मिळवण्यासाठी भरत कराडसारख्या तरुणांनी आहुती दिली होती. आजही ओबीसी तरुण आरक्षण टिकवण्यासाठी लढतोय. आम्ही सरकारकडे केवळ एकच गोष्ट मागतोय. तुम्हाला ज्यांना आरक्षण द्यायचं आहे त्यांना द्या. परंतु, आमच्या आरक्षणावर अतिक्रमण करू नका. मराठा समाजासाठी ५० टक्के आरक्षण मोकळं आहे, त्यानंतर केंद्र सरकारने EWS हे आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी १० टक्के आरक्षण सुरू केलं आहे. त्यापैकी ९० टक्के वाटा मराठा समाजाने घेतला आहे. परंतु, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हवं आहे. मुळात आमच्याकडे १७ टक्के आरक्षण शिल्लक आहे. या गरिबांचं आरक्षण हिरावू नका.”