धुळे : सण, उत्सवात आवाजाच्या भिंतींमुळे (डीजे) आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, लेसर प्रकाशामुळे होणारा दृष्टीदोष, याकडे लक्ष वेधण्यासाठी येथे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी सकाळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात डाॅक्टर, वकील, ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, शालेय विद्यार्थी आणि व्यावसायिक यांची एकजूट दिसून आली. सर्वांनी आवाजाच्या भिंती, लेसर प्रकाशाचा वापर बंद करण्याची मागणी केली.

धुळ्यातील श्रीराम पेट्रोल पंपाजवळील छत्रपती शिवाजी स्मारकापासून मोर्चला सुरुवात झाली. मोर्चात आयएमएचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष रवी वानखेडकर, आयएमए धुळेचे अध्यक्ष मनिष जाखेटे, उपाध्यक्ष महेंद्र राजपूत, सचिव योगेश ठाकरे, खजिनदार राहुल बच्छाव, चारुहास जगताप, नारायण गलाणी, संजय शिंदे, रवींद्र पाटकरी, विवेक जाधव, स्वप्निल पाटील, अभिनय दरवडे या डाॅक्टरांसह धुळे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग, सेंट अँथनी स्कुलचे फादर विल्सन रॉड्रीक्स यांच्यासह शहरातील अनेक संस्था, संघटनांचे पदाधिकारी तसेच विविधि शाळांमधील विद्यार्थी, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी-विद्यार्थीनी, वकील संघटना आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मानवाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणाऱ्या आवाजाच्या भिंतींना कायमस्वरुपी हद्दपार केले पाहिजे. कारण, या आवाजाच्या भिंतींचा दणदणाट उत्साहाच्या भरात ८५ ते १२० डेसीबलवर पोहचतो, यामुळे श्रवणशक्ती कमी होणे, कानात सतत काहीतरी गुणगुणत असल्याची आणि सतत काहीतरी वाजल्याची जाणीव होणे, कर्णपटल व श्रवण पेशींना अपाय होणे, मस्तिष्क स्नायुंवर परिणाम होवून चिडचिड, झोप न लागणे, एकाग्रतेत अडथळा येणे, लहान मुलांच्या बौध्दिक विकासावर नकारात्मक परिणाम होणे, रक्तदाब वाढणे, हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढणे, गरोदर स्त्रियांमध्ये भ्रुणावर विपरित परिणाम होणे, वृध्दांमध्ये डोकेदुखीची समस्या उद्भवणे असे शारीरिक विकार होतात. लेसर प्रकाशामुळे डोळ्यांवर परिणाम होतो, दृष्टीही जाते. शिवाय वाहतूक कोंडी, मारामाऱ्या, अपघात असे सामाजिक दुष्परिणामही आहेत. त्यामुळे आवाजाच्या भिंतींना कायमस्वरूपी हद्दपार करावे, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे.

या मोर्चाला शहरातील सेंट अँथनी स्कुल, चावरा इंग्लिश स्कुल, जयहिंद इंग्लिश स्कुल, आई एकविरा देवी कनिष्ठ विद्यालय, एसीपीएम मेडिकल ॲण्ड डेन्टल कॉलेज, हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, एसएसव्हीपीएस महाविद्यालय, अभय युवा महाविद्यालय, निकम इन्स्टिट्युट तसेच धुळे जिल्हा वकील संघ, इंडियन डेंटल असोसिएशन, सीए असोसिएशन, होमिओपॅथी असोसिएशन, इंजिनिअर असोसिएशन, क्रेडाई, सीए, निमा, वैद्यकीय प्रतिनिधी संघटना, मराठा सेवा संघ, मराठा पंच मंडळ, वकील संघ, व्यापारी संघटना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, महानगर नागरी हक्क संघर्ष समिती, शिक्षक संघटना, ज्येष्ठ नागरिक संघटना, ग्रीन धुळे वृक्ष टीम, रोटरी क्लब, पत्रकार संघटना, महापालिका कर्मचारी वर्ग, वैद्यकीय कर्मचारी विकास संस्था, नवोदय युवा मंच, जिल्हा रुग्णालय, पोतदार इंटरनॅशनल स्कुल, वंदे मातरम प्रतिष्ठान, जिजाऊ महिला ज्येष्ठ नागरिक संघटना, नर्सिंग संघटनेने पाठिंबा दिला. मोर्चाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

ज्या गोष्टींनी सार्वजनिक आरोग्यावर दुष्परिणाम होतात, त्या गोष्टींना आपण सर्वांनी विरोधच केला पाहिजे. हा मोर्चा कोणत्याही जाती, धर्माच्या विरोधात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन सर्वांनीच केले पाहिजे. त्यामुळे कुठल्याही सणाला आवाजाच्या भिंतींना आमचा विरोध असेल. – डॉ. रवी वानखेडकर (माजी राष्ट्रीय अध्यक्ष, आयएमए संघटना)