असॉल्ट रायफल घेऊन फिरणाऱ्या एका तालिबानी दहशतवाद्याच्या फोटोमुळे सध्या नागपूर हादरुन गेलं आहे. नागपूरमधून जून महिन्यामध्ये बेकायदेशीर वास्तव्य केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या अफगाणिस्तानच्या नूर महोम्मद ऊर्फ अब्दुल हकला मायदेशी पाठवण्यात आलं होतं म्हणजेच डिपोर्ट करण्यात आलं होतं. मात्र आता तो तालिबान्यांमध्ये शामिल झाल्याची भीती या व्हायरल फोटोनंतर व्यक्त करण्यात येतेय.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार नागपूर शहर पोलिसांनी मोहम्मदला जून महिन्यामध्ये अफगाणिस्तानमध्ये परत पाठवलं. तो अनधिकृतपणे भारतामध्ये वास्तव्यास असल्याची माहिती तपासामध्ये समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मात्र सध्या नागपूरमध्ये चर्चेचा विषय ठरत असणाऱ्या अफगाणिस्तानमधील तालिबान्याचा फोटो हा मोहम्मदचाच असल्याचा दुजोरा मात्र पोलिसांनी दिला नाहीय.
नक्की वाचा >> अफगाणिस्तान: अमेरिकन विमानाला लटकून देशाबाहेर जाण्याच्या प्रयत्नात १९ वर्षीय फुटबॉलपटूचा मृत्यू
मोहम्मद हा पर्यटकांना दिल्या जाणाऱ्या व्हिजावर भारतामध्ये आला होता. हा सहा महिन्यांचा व्हिजा २०१० मध्ये संपणार होता. मोहम्मद हा दिल्लीमधून नागपूरला आला आणि तो इथेच राहत होता. मोहम्मद हा चादरी विकण्याचा व्यवसाय करायचा तसेच तो बेकायदेशीरपणे पैसे कर्ज म्हणून देण्याचं कामही करायचा. पोलिसांना आणि तपास यंत्रणांना चकवा देत मोहम्मदने येथे काही मालमत्ताही खरेदी केली होती.
मोहम्मद हा तालिबान समर्थक होता आणि सोशल नेटवर्किंगवरील त्याच्या पोस्टवरुन त्याचा या कट्टरतावादी गटाला समर्थन असल्याचा स्पष्ट होत आहे, असं सुरक्षा यंत्रणांनी सांगितलेलं. मोहम्मदने बनवलेल्या एका व्हिडीओमध्ये त्याने समाजातील इतर घटकांमधील लोकांना आणि त्याच्या धर्माला विरोध करणाऱ्यांना ठार मारण्यासंदर्भात भाष्य केलं होतं. पख्तून भाषेमध्ये बोलताना त्याने हा धमकी देणारा व्हिडीओ शूट केल्याचं टाइम्स ऑफ इंडियाने म्हटलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरच पोलिसांची सूत्र हलली आणि मोहम्मदवर कारवाई करण्यात आली.
नक्की वाचा >> किती जणांनी अफगाणिस्तानमधून केलं पलायन?, काबूल विमानतळावर किती लोक?; अमेरिकेने दिली आकडेवारी
१० वर्षांमधील मोहम्मदच्या सर्व हलचाली तपासून पाहण्यात आल्याचं नागपूर पोलिसांचे प्रमुख अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे. मात्र यामध्ये त्याचा दहशतवादी कृत्यांशी काही संबंध असल्याचं समोर आलं नाही. त्यामुळेच त्याच्याविरोधात बेकायदेशीर पद्धतीने राहण्याबद्दल गुन्हा दाखल करण्याऐवजी थेट मायदेशी पाठवून देण्याचा निर्णय़ घेण्यात आला आणि त्याला काबूलमध्ये सोडण्यात आलं.
“व्हायरल फोटोमधील व्यक्ती मोहम्मद आहे की त्याच्यासारखा दिसणारी इतर व्यक्ती हे सांगणं कठीण आहे. मी स्वत: त्याची चौकशी केलीय. मात्र फोटोमधील व्यक्तींचा चेहरा हा मोहम्मदच्या चेहऱ्याशी मिळताजुळता वाटत नाही,” असंही कुमार म्हणाले. तसेच आपल्यावर गुन्हा दाखल करावा असं मोहम्मदचं म्हणणं होतं म्हणझे त्याला नागपूरमध्येच राहता आलं असतं. मोहम्मदच्या अंगावर गोळी लागण्याचं निशाण होतं असंही पोलिसांना सांगितलं. एका गावामध्ये गरजूंना अन्नदान करताना तालिबान्यांनी गोळीबार केला तेव्हा जखम झाल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं होतं.
सुरक्षा यंत्रणांना नागपूरमध्ये मोहम्मदला ओळखणाऱ्या काहींनी हा फोटो पाठवून हा मोहम्मद असल्याचा दावा केलाय.