उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर येणार असून यावेळी काही उद्योजक तसंच बॉलिवूड सेलिब्रेटींची भेट घेणार आहेत. उत्तर प्रदेशात उभारण्यात येणाऱ्या फिल्मसिटीसंबंधी योगी आदित्यनाथ यावेळी चर्चा करणार असून गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित करणार आहेत. यावरुनच आता राज्यातील राजकीय वातावरण तापत असल्याचं दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपावर निशाणा साधला होता. त्याला भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उत्तर दिलं आहे.

“आपण मुख्यमंत्री असताना त्यावेळेस सैनिकांच्या जागेवर आदर्श इमारत उभी करताना महाराष्ट्राची प्रगती आठवली नाही? महाराष्ट्रात उद्योग येणारच इथे प्रगती होणारच फक्त जरा आदर्श पलीकडे पहा @AshokChavanINC आपल राज्य अजून उत्तम कस होईल याचा विचार करा.” असं केशव उपाध्ये यांनी ट्विट केलं आहे.

उपाध्ये यांनी अशोक चव्हाण यांचे ट्विट देखील सोबत जोडलं आहे. ज्यामध्ये अशोक चव्हाण यांनी म्हटले होते की, “भाजपच्या ५ वर्षाच्या काळात दिवसाढवळ्या महाराष्ट्रातील अनेक उद्योग अन् कार्यालये गुजरातला पळवण्यात आली. आता महाराष्ट्रातले सरकार बदलले, तर उत्तरप्रदेश सरकारच्या नावाखाली बॉलीवूडचे लचके तोडण्याची पटकथा तयार झालेली दिसते. पण भाजपच्या काळात जे झाले ते आम्ही पुन्हा घडू देणार नाही.”

“या पापात सहभागी होऊन भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्राशी द्रोह करू नये”; अशोक चव्हाणांचा सल्ला

तसेच, “देशातील सर्व राज्यांची प्रगती झाली पाहिजे आणि त्यासाठी केंद्र व सर्व राज्यांनी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे, याबाबत दूमत नाही. पण ताकदीच्या बळावर दुसऱ्याच्या ताटातील घास हिसकावून पोट भरणे योग्य नाही. या पापात महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी सहभागी होऊन महाराष्ट्राशी द्रोह करू नये,” असा टोला देखील राज्यातील भाजपा नेत्यांना अशोक चव्हाण यांनी लगावला होता. याला भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे.