कराड : सर्वदूर सायबर गुन्ह्यांचे जाळे दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, लहान मुले, युवक- युवती, महिला तसेच वृद्ध नागरिक असे सर्वच जण या फसवणुकीला बळी पडत आहेत. तरी भ्रमणध्वनी व समाज माध्यम वापरताना कमालीचे सतर्क रहाणे गरजेचे असल्याचे आवाहन राज्याचे पोलीस उपमहानिरीक्षक (सायबर क्राईम) संजय शिंत्रे यांनी केले. लायन्स क्लबच्या कराड शाखेतर्फे आयोजित ‘सायबर जनजागृती अभियान’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. कराडच्या पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील, लायन्स क्लबचे शाखाध्यक्ष सतीश मोरे, डॉ. विरेंद्र चिखले, राजेंद्र शहा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
संजय शिंत्रे यांनी सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार सविस्तरपणे उलगडून सांगितले. डिजिटल अरेस्ट, व्हिडिओ कॉलद्वारे फसवणूक, बँक फ्रॉड, डीप फेक, रोमान्स स्कॅम, फिशिंग, ओटीपी फ्रॉड अशा एकना अनेक गुन्ह्यांची उदाहरणांसह मुद्देसूद माहिती दिली. तुमचे समाज माध्यमावरील छायाचित्र हे तुमची ओळख म्हणून वापरले जाऊ शकते. आधार पत्रिका, पॅन पत्रिका आदी कागदपत्रांचा गैरवापर टाळण्यासाठी त्यांचे सुयोग्य, काटेकोर संरक्षण करा, अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या मैत्रीची विनंती (फ्रेंड रिक्वेस्ट) स्वीकारण्यापूर्वी त्यांची ओळख पटवावी, असा सल्ला संजय शिंत्रे यांनी दिला.
अनोळखी दूरध्वनी किंवा संदेश आल्यास, त्याची माहिती त्वरित आपल्या कुटुंबीयांशी किंवा मित्रांशी चर्चा करून पडताळावी. सायबर गुन्ह्याच्या तक्रारीसाठी सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 तसेच http://www.cybercrime.gov.in या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करता येते. तक्रार जितक्या लवकर केली जाईल, तितकी कारवाईची संधी अधिक असल्याचे संजय शिंत्रे यांनी सांगितले.
प्रास्ताविकात लायन सतीश मोरे यांनी भ्रमणध्वनी, समाज माध्यम वापरताना घ्यायची काळजी आणि सायबर गुन्हेगारीचे आपण बळी ठरू नये. या गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन व्हावे म्हणून पोलीस उपमहानिरीक्षक (सायबर क्राईम) संजय शिंत्रे यांचे मार्गदर्शन ठेवल्याचे सांगितले.
कार्यक्रमास कराड शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू तशीलदार, महेंद्र जगताप, लायन जगदीश पुरोहित, महेश खुस्पे, मंजिरी खुस्पे, कराडच्या शासकीय कृषी महाविद्यालयाच्या डॉ. इंदिरा घोनमोडे, जितेंद्र जाधव, शशिकांत पाटील आदींसह शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, युवावर्ग, महिला, शहरातील विविध सेवाभावी व सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्त यांच्यासह सर्व घटकांतील नागरिक उपस्थित होते.