अलिबाग समुद्रात २ तरुण बुडाल्याच्या बातमीने आज अलिबागमध्ये एकच खळबळ उडाली. महसूल, पोलीस आरोग्य यंत्रणेबरोबरच पत्रकारांची एकच धावपळ उडाली, परंतु थोडय़ाच वेळात ही आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम असल्याचे स्पष्ट होताच सर्वानीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
सायंकाळी पावणेचार वाजण्याची वेळ अलिबाग तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, पोलीस ठाणे जिल्हा रुग्णालयात फोन खणखणले. जे. एस. एम. कॉलेजच्या मागील बाजूस समुद्रात पोहत असलेल्या तीन तरुणांपकी दोघेजण बुडाले असा संदेश या फोनवरून देण्यात आली. सर्वच यंत्रणांची धावपळ उडाली. सर्वानी हातातील कामे टाकून तिकडे धाव घेतली. अलिबागचे नायब तहसीलदार मिलिंद मुंढे, गटविकास अधिकारी वीणा सुपेकर तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा रुग्णालयाची रुग्णवाहिकाही किनाऱ्यावर पोहोचली. पत्रकार आणि नागरिकांपर्यंतही ही बातमी पोहोचताच त्यांनीही तिकडे धाव घेतली. पत्रकारांच्या लेखण्या आणि छायाचित्रकारांचे कॅमेरे सरसावले.
किनाऱ्यावर चांगलीच गर्दी जमली होती. गर्दीमधून हळहळ व्यक्त होत होती. बुडणाऱ्या तरुणाला पाण्याबाहेर काढून आधी उचलून नंतर स्ट्रेचरवरून आणून रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. जमलेल्यांनी बुडणाऱ्या दुसऱ्या तरुणाची चौकशी सुरू केली. त्याला शोधण्यासाठी बोट खोल समुद्रात गेल्याचे सांगण्यात आले. परंतु थोडय़ाच वेळात हा सारा प्रकार म्हणजे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची रंगीत तालीम आणि यंत्रणांची परीक्षा असल्याचे समोर आले आणि उपस्थित सगळ्यांचाच जीव भांडय़ात पडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disaster management mock drill in alibaug
First published on: 10-05-2015 at 01:36 IST