हिंगोली: दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या प्रथम स्मृतिदिनाच्या निमित्ताने सोमवारी कळमनुरी येथे आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री वर्षां गायकवाड आणि दिवंगत सातव यांच्या पत्नी आमदार रजनी सातव यांच्यातील नाराजी नाटय़ समोर आले. गायकवाड आणि सातव यांनी एकमेकांसमोर येण्याचे टाळले. या दोघींमधील नाराजी नाटय़ जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले.

पालकमंत्री गायकवाड यांच्या हस्ते राजीव सातव यांच्या अर्धकृती पुतळय़ाचे अनावरण, समाधीस्थळ लोकार्पण केले जाणार होते. मात्र पालकमंत्री येण्यापूर्वीच हा कार्यक्रम पार पडला. पालकमंत्री गायकवाड या ठिकाणी पोहोचल्यावर आमदार प्रज्ञा सातव यांना निरोप पाठवूनही त्या या ठिकाणी फिरकल्या नाहीत. त्यामुळे पालकमंत्री गायकवाड यांनी सातव यांच्या पुतळय़ाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि त्या आल्या पावली निघून गेल्या.

दिवंगत खासदार सातव यांच्या पुण्यतिथीनिमित्त कळमनुरी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिर,ह. भ. प. सोपान महाराज सानप यांचे कीर्तन, तसेच राजीव सातव यांच्या अर्धकृती पुतळय़ाचे अनावरण, समाधीस्थळ लोकार्पण यांचा त्यात समावेश होता. पालकमंत्री गायकवाड यांचे दुपारी साडेबाराच्या सुमारास येथे आगमन झाले. माजी मंत्री रजनी सातव यांनी त्यांचे स्वागत केले. दोघींनी एकमेकींशी संवाद साधला आणि वर्षां गायकवाड, रजनी सातव समाधीस्थळी पोहोचल्या. पण आमदार प्रज्ञा सातव तिथे आल्याच नाहीत.

कीर्तनास भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे पूर्णवेळ उपस्थित होते. रिसोडचे काँग्रेसचे आमदार अमित झनक, माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर, माजी आमदार डॉ. संतोष टारफे, काँग्रेसचे जिल्हाकार्याध्यक्ष मुनीर पटेल यांच्यासह अनेक नेते या वेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील काँग्रेस अंतर्गत गटबाजी सर्वश्रुत असली तरीही दिवंगत खासदार सातव यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्याचे दर्शन घडेल असे अपेक्षित नव्हते. पालकमंत्री गायकवाड राजस्थान येथील चिंतन शिबिरातून वेळ काढून कळमनुरीत आल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार प्रज्ञा सातव आणि वर्षां गायकवाड यांच्यात विधानपरिषदेच्या निवडीवरून मतभेद झाले, तेव्हापासून या दोघींमध्ये दुरावा निर्माण झाला. हा निर्माण झालेला दुरावा सातव यांच्या स्मृतिदिनी दूर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत असतांना प्रज्ञा सातव यांनी पालकमंत्री वर्षां गायकवाड यांच्याशी संवाद साधणे तर दूरच, पण एकमेकींचे तोंडही त्यांनी पाहिले नाही.