सांगली: रस्ते कामाच्या विषयावरून महापालिकेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या समर्थक नगरसेवकामध्ये हातघाईचा प्रसंग उद्भवला. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या महासभेत हा प्रकार घडल्यानंतर महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी दोन्ही सदस्यांना निलंबित करीत सभागृहाबाहेर जाण्याचे आदेश दिले.
महापालिकेची महासभा शुक्रवारी दुपारी महापौर सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी मिरजेतील खाजा वसाहतीमधील रस्ते कामाचा विषय चर्चेला आला असताना राष्ट्रवादीच्या नगरसेविका संगीता हारगे यांनी रस्ते कामाचा प्रस्ताव दुबार असल्याचे कारण देत प्रशासनाकडून रद्द केले गेले असताना भूसंपादन झालेले नसताना रस्ते कामाची निविदा कशी काढली असा सवाल उपस्थित केला. या दरम्यान, या मुद्द्याला अजितदादा गटाचे सदस्य योगेंद्र थोरात यांनी आ. जयंत पाटील यांचा प्रशासनावर दबाव असल्याने विकास कामात अडथळे येत असल्याचा आक्षेप घेतला. यावरून वादंग माजला.
आणखी वाचा-महायुती किंवा महाविकास आघाडीत जाणार का? राजू शेट्टी म्हणाले…
माजी महापौर व राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी थोरात यांच्या विधानाला तीव्र आक्षेप घेत महापौरांच्या आसनाकडे धाव घेत थोरात यांनी माफी मागावी अशी मागणी केली. याचवेळी राष्ट्रवादीचे सदस्य शेडजी मोहिते, श्रीमती हारगे, विष्णु माने, जमिल बागवान आदींही महापौरांच्या समोरील मोकळ्या जागेत धावले. बागवान यांनी केलेली माफीची मागणी थोरातांनी अमान्य करताच बागवान त्यांच्या दिशेने कंबरेचा पट्टा काढून मारण्यास धावले. भाजप व काँग्रेसच्या सदस्यांनी त्यांना अटकाव केला. महापौरांनीही हारगे आणि थोरात यांना एक दिवसासाठी निलंबित करीत सभागृहाबाहेर जाण्याचे निर्देश दिले.
आणखी वाचा-अकोल्यात जुळवाजुळवीवर सर्वच राजकीय पक्षांचा भर
दरम्यान, बाग व अन्य कामासाठी मजुर पुरवठा करणार्या ठेकेदाराकडून मजुरांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा मुद्दाही चर्चेला आला. यावेळी महिला मजुरांनी समक्ष उपस्थित राहून दोन महिने पगार मिळाला नसल्याचे आणि मासिक मानधनातून दोन ते नउ हजार रूपये ठेकेदार घेत असल्याचे सांगितले. यानंतर सदर ठेकेदाराकडून मजुर पुरवठा करण्याचा ठेका रद्द करण्याचे आदेश महापौरांनी दिले.