सांगली : अतिक्रमण हटवत असताना महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या अंगावर जाण्याचा प्रकार शुक्रवारी मिरजेत घडला. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. या प्रकरणी सायंकाळपर्यंत कोणतीही तक्रार मात्र दाखल झालेली नव्हती.

याबाबत माहिती अशी, अबावली दर्गा परिसरात मुख्य रस्त्याच्या बाजूवर काही नव्याने खोकी बसविण्यात आली आहेत. या अनाधिकृत खोक्यावर कारवाई करण्यासाठी अतिक्रमण निर्मुलन पथक जेसीबीसह गेले होते. या ठिकाणी चार खोकी असल्याची माहिती महापालिकेकडे होती. यावेळी एक खोके हटविल्यानंतर दुसरे खोके हटवत असताना अतिक्रमण निर्मुलन पथकाचे प्रमुख दिलीप घोरपडे आणि संबंधित खोकेधारक यांच्यात वाद झाला. या वादात घोरपडे यांच्या अंगावर धावून जात त्यांची शर्टाची कॉलर पकडण्याचा प्रयत्नही झाला.

वादावादीचा प्रकार घडल्यानंतर संबंधितांनी अतिक्रमण हटाव मोहिम स्थगित करत पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, सायंकाळपर्यंत तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती.

दरम्यान, शहरात बहुतांशी ठिकाणी मुख्य रस्त्यावर रहदारीला अडथळा ठरणारे ठेले बसविण्यात आले आहेत. यामुळे वारंवार वाहतूक कोंडीही होत आहे. महापालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम कायदेशीरपणे न राबवता विशिष्ट हेतूने राबवली जात असल्याचा आरोप होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कुपवाड व मिरज औद्योगिक वसाहतीमध्येही अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही दोन दिवसांपासून सुरू आहे. मात्र, याबाबत जनसंपर्क विभागाकडे चौकशी केली असता अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.