अहिल्यानगर : अवघ्या चार महिन्यांवर आलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडसाद आज, गुरुवारी झालेल्या बँकेच्या अखेरच्या वार्षिक सभेत उमटले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे गटाकडून विद्यमान अध्यक्ष आमदार शिवाजी कर्डिले यांना पुन्हा अध्यक्षपदासाठी शुभेच्छा दिल्या गेल्या. मात्र, अनुमोदनासाठी आपल्याला यंदा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत लक्ष घालावे लागणार असल्याचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी जाहीर केले. त्यामुळे भाजपमधील गटबाजी उघड झाली. बँकेतील बाळासाहेब थोरात गटाचे संचालक मात्र ‘थांबा आणि पहा’च्या भूमिकेत होते. मतदानाच्या हक्कासाठी ५ हजार रुपयांचे शेअर जमा करण्यासाठी झुंबड उडाली होती.

जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत फेब्रुवारीमध्ये संपत आहे. त्यामुळे सेवा संस्थांचे ठराव गोळा करण्यासाठी इच्छुक संचालकांची चाचपणी सुरू झाली आहे. संचालक मंडळाची ही अखेरची वार्षिक सभा होती. त्यामुळे सभेस सभापती राम शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी खासदार डॉ सुजय विखे आवर्जून उपस्थित होते. सभेत बँकेचे नामांतर अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असे करण्यात आले.

यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसने थोरात गटाच्या साहाय्याने बॅंक ताब्यात ठेवली. विखे गटाला विरोधात बसावे लागले. मात्र राज्यात भाजपप्रणीत महायुतीचे सरकार येताच चार वर्षांपूर्वी पाच संचालक फुटले व मंत्री विखे यांच्या पुढाकारातून भाजपचे शिवाजी कर्डिले अध्यक्षपदी विराजमान झाले. आता थोरात व विखे गटाकडून आगामी निवडणुकीसाठी इच्छुकांचे पॅनल कशा पद्धतीने तयार केले जाते, या हालचालींकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

मंत्री विखे भाषण करून लगेच निघून गेले. माजी खासदार विखे यांनी कर्डिले व बँकेच्या कारभाराचे तोंड भरून कौतुक करत बँकेची ही शेवटची सभा आहे, पुढील वेळीही कर्डिले हेच अध्यक्ष राहावेत, अशा शुभेच्छा दिल्या. त्यावर सभापती शिंदे यांनी टोले लगावले. ते म्हणाले, ‘बँकेचा अध्यक्ष प्रथमच भाजपचा झाला असला, तरी तो पालकमंत्र्यांच्या सहकार्यातून झालेला आहे. यापूर्वी मी कधीच बँकेत लक्ष घातले नाही. लांबच राहिलो. आता विखे यांनी कर्डिले यांना पुन्हा अध्यक्ष करण्याचा ठराव केला आहे. त्याला अनुमोदन देण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. त्यामुळे मला बँकेत लक्ष घालावेच लागणार आहे.’भाजपमधील ही गटबाजी उघड होत असताना, माजी मंत्री बाळासाहेब थोरात गटाचे संचालक मात्र सभेमध्ये ‘थांबा आणि पहा’च्या भूमिकेत असल्याचे दिसत होते.

छायाचित्र वगळले, हे घडले कसे?

जिल्हा बँकेच्या वार्षिक अहवालातून सभापती राम शिंदे यांचे छायाचित्र वगळले गेले होते. नंतर पुन्हा छायाचित्र असलेला सुधारित अहवाल छापून तो वितरित करण्यात आला. या संदर्भात बोलताना राम शिंदे म्हणाले, ‘मी पूर्वी विरोधी पक्षाचा पालकमंत्री असल्याने जिल्हा बँकेने अहवालात माझे छायाचित्र प्रसिद्ध केले नव्हते. परंतु मी त्या वेळीही तक्रार केली नव्हती. आताही माझी तक्रार नाही. परंतु भाजपचे कर्डिले अध्यक्ष असताना हे कसे घडले याचे आश्चर्य वाटते. म्हणून मी प्रथमच बँकेच्या सभेस उपस्थित राहिलो. यापूर्वी लक्ष घातले नाही आता निवडणूक आली आहे. त्यामुळे बँकेत लक्ष द्यावे लागेल.’

आजी की माजी आमदार?

सभापती राम शिंदे यांनी भाषणात बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांचा माजी आमदार उल्लेख केला. त्यावर काही संचालक व सभासदांनी लगेच आजी आमदार आहेत, याची आठवण करून दिली. त्यावर पुन्हा सभापती शिंदे यांनी मी बँकेत कधी आलो नाही, त्यामुळे असे होते. माजी मंत्री ऐवजी माजी आमदार म्हणालो. खरे तर भावी अध्यक्ष असे म्हणायला हवे, असे असाही टोला शिंदे यांनी लगावला.

मतदार होण्यासाठी झुंबड

बँकेने मतदानासाठी क्रियाशील सभासदाऐवजी ५ हजार रुपयांचे शेअर जमा असणाऱ्या सभासदास मतदानाचा हक्क राहील, असा ठराव केला आहे. त्यामुळे शेअरची रक्कम जमा करण्यासाठी व पावती घेण्यासाठी झुंबड उडाली होती. काही संचालकांनी सेवा संस्थांचे पैसे जमा केले.