परभणी: भारतीय जनता पक्षाच्या महानगर जिल्हाध्यक्षपदी शिवाजी भरोसे यांची नियुक्ती झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी आनंद भरोसे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. या सख्ख्या भावांकडे महायुतीतल्या प्रमुख पक्षांची संघटनात्मक जबाबदारी येण्याचे हे उदाहरण राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया नुकतीच घोषित झाली असून, येथील महानगर जिल्हाध्यक्षपदी शिवाजी भरोसे यांची पक्षाच्या वतीने निवड करण्यात आली आहे. प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी राज्यभरातील जिल्हाध्यक्षांच्या ज्या नियुक्त्या जाहीर केल्या. त्यात परभणी महानगर जिल्हाध्यक्षपदाची घोषणा केली आहे. परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची निवड मात्र अद्याप पक्षाच्या वतीने घोषित करण्यात आली नाही.
भाजपच्या शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्त्या गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या होत्या. महानगर जिल्हाध्यक्षपदी निवड झालेले शिवाजी भरोसे हे यापूर्वी महानगरपालिकेचे सदस्य राहिले आहेत. त्यांच्या निमित्ताने एका तरुण चेहऱ्याला पक्षाने जिल्हाध्यक्षपदाची संधी दिली आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ही नियुक्ती भरोसे यांच्यासाठी नवी जबाबदारी मानली जात आहे.
शिवाजी भरोसे यांचे बंधू आनंद भरोसे यांनीही दीर्घकाळ भारतीय जनता पक्षाच्या परभणी महानगर जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली होती. भाजपने शहर जिल्हाध्यक्षपद जाहीर केले असले, तरी अद्याप ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची घोषणा केलेली नाही. सामाजिक समतोल राखण्यासाठी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्षपद हे ‘ओबीसी’ प्रवर्गाला दिले जाईल असे संकेत आहेत.शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) जिल्हाप्रमुखपदी आनंद भरोसे यांची नियुक्तीही नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना जेव्हा स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढले तेव्हा परभणीतून भाजपच्या वतीने आनंद भरोसे यांनी २०१४ या वर्षी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीआधी ते काँग्रेस पक्षात क्रियाशील होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत भरोसे यांनी ‘उबाठा’ शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. संघटनात्मक पातळीवर भरोसे यांच्याकडे आता शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुखपद आले असून, त्यांच्याकडे परभणी, जिंतूर या दोन विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षेत्र देण्यात आले आहे.
भरोसे हे सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. क्रिकेट स्पर्धेपासून ते कृषी महोत्सवापर्यंत अनेक उपक्रमांचा यात समावेश आहे. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीवर त्यांनी दहा वर्षे प्रतिनिधित्व केले होते. उपसभापतिपदाची संधीही त्यांना त्या काळात मिळाली. त्यानंतर पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांनी विजय संपादन केला. २००७ साली ते जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. भरोसे यांची राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सेनेच्या जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. महायुतीतील दोन प्रमुख पक्षांचे जिल्हाध्यक्षपद सख्ख्या भावांकडे असण्याचे अपवादात्मक उदाहरण सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.