लोकसत्ता वार्ताहर

परभणी : एका क्रीडा स्पर्धेचे बील काढण्यासाठी आणि जलतरणिकेची मान्यता देण्यासाठी दीड लाखाची लाच घेताना जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे या महिलेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तिच्या सहकाऱ्यासह अटक केली आहे. या प्रकरणात नानकसिंग महासिंग बस्सी यासही अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या महिला अधिकार्‍यास बडतर्फ करण्याची मागणी नुकतीच केली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, २०२४ साली झालेल्या क्रीडा स्पर्धेतील आयोजनाचे ५ लाख रूपयांचे देयक तसेच जलतरणिका बांधकामाचे ९० लाख रूपयांचे देयक नावंदे यांच्या कार्यालयात प्रलंबीत होते. त्यासाठी तक्रारदाराने क्रीडा अधिकारी बस्सी याची भेट घेतली असता ही बिले मंजुर करण्यासाठी नावंदे यांच्यासाठी २ लाख तर बस्सी याने स्वतःसाठी ५० हजार असे एकुण अडीच लाख रूपये मागितले.

तक्रारदाराने १३ मार्च रोजी यातील एक लाख रूपयाची रक्कम नावंदे यांना बस्सी याच्या समक्ष दिली. उर्वरित दीड लाख रूपये देण्याची तक्रारदाराची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. या संदर्भात गुरुवारी (दि.२७) सापळा रचण्यात आल्यानंतर बस्सी यांनी स्वतःसाठी ५० हजार रूपये स्विकारून एक लाखाची लाचेची रक्कम नावंदे यांच्या दालनात नेली. या दोघांनाही लाचलुचत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍याने दीड लाख लाचेच्या रक्कमेसह कार्यालयातच ताब्यात घेतले.

दरम्यान याप्रकरणी आरोपींची व त्यांच्या घराचीही झडती घेण्यात आली. नावंदे यांच्या घर झडतीत एक लाख पाच हजार रूपये आढळून आले. या दोन्ही आरोपींविरूध्द नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. क्रीडा अधिकारी कार्यालयातील एका कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांनी कुटुंब निवृत्ती वेतनाची मागणी केलेली असताना नावंदे यांनी या संदर्भातील कार्यवाही करण्याकरिता पैशांची मागणी केली होती. यासंदर्भात पैसे मागितल्याची ऑडीओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरलही झाली होती.

लोकप्रतिनिधींनी केली होती बडतर्फीची मागणी

दरम्यान नावंदे या लाचखोर असल्याने त्यांना बडतर्फ करा अशी मागणी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी अलीकडेच विधानसभेत केली होती. जिल्हा क्रीडा संकुलाचा कोणत्याही प्रकार विकास न करता खेळाडूंकडूनही त्या पैसे वसुल करत आहेत असा आरोप करून आमदार पाटील यांनी त्यांच्या विभागीय चौकशीची मागणी केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार राजेश विटेकर यांनीही एका लक्षवेधीच्या अनुषंगाने नावंदे यांच्या आर्थिक गैरव्यवहाराकडे विधानसभेत लक्ष वेधले होते. यापुर्वीही नावंदे यांच्यावर अनेक गैरव्यवहाराचे आरोप असताना शासनस्तरावर यासंबंधिचा चौकशी अहवाल धुळखात पडून आहे. त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी आमदार विटेकर यांनी केली होती. एकुणच नावंदे यांचा पूर्व इतिहास अत्यंत वादग्रस्त असल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे. आज झालेल्या कारवाईनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.