दुसऱ्या घटनेत डॉक्टरविरुद्ध पोलिसांकडे तक्रार अर्ज

नगर : करोनाबाधितावर उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाइकांनी डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण करून केबिनची तोडफोड केल्याच्या आरोपावरून तोफखाना पोलिसांनी दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. शहराच्या तारकपूर भागातील सिटीकेअर रुग्णालयात ही घटना मध्यरात्री घडली. दुसऱ्या घटनेत नागापूरमधील डॉक्टरने मारहाण केल्याची तक्रार रुग्णाच्या नातेवाइकांनी एमआयडीसी पोलिसांकडे केली आहे.

यासंदर्भात तोफखाना पोलिसांनी डॉ. राहुल अरुण ठोकळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पंकज तानाजी गडाख व रोहन बाबासाहेब पवार (दोघेही रा. टाकळी काझी, नगर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीनुसार तानाजी नारायण गडाख (७८) यांना करोना संसर्गावरील उपचारासाठी सिटीकेअर रुग्णालयात दि. ८ मे रोजी दाखल केले होते. काल, बुधवारी रात्री तानाजी गडाख प्राणवायूचा मास्क सारखा काढत होते, यामुळे एका नातेवाइकाला व कर्मचारी प्रवीण गायकर यांना रुग्णाजवळ थांबण्यास सांगितले होते. गायकर रुग्णाने काढलेला प्राणवायूचा मास्क लावत असतानाच काही वेळाने तानाजी गडाख यांचा मृत्यू झाला. ही माहिती कर्मचाऱ्यांनी नातेवाइकांना सांगितल्यानंतर पंकज व रोहन या दोघांनी डॉ. ठोकळ व गायकर या दोघांना मारहाण करून ओपीडीतील फोन, विवो यंत्र, कर्टन याची तोडफोड केली.

दरम्यान नागपूर परिसरातील एका रुग्णालयाच्या डॉक्टरने रुग्णाच्या नातेवाइकांना मारहाण केल्याची घटना काल, बुधवारी दुपारी घडली. यासंदर्भात एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांवर व्यवस्थित उपचार केले जात नाहीत, हलगर्जीपणा केला जातो, याकडे नातेवाइकांनी लक्ष वेधल्याचा राग येऊन डॉक्टरनेच मारहाण केली असा तक्रार अर्ज आहे. यानंतर रुग्णाला जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तक्रारीची चौकशी सुरू असल्याचे सहायक निरीक्षक आठरे यांनी सांगितले.