सोलापूर : होमिओपॅथी वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर झालेल्या नवविवाहितेला, तुला डोळ्यांचा गंभीर आजार आहे. त्यावर इलाज होणे अशक्य आहे. तू कायमची अंध होणार आणि तुझ्या पोटी जन्मणारी संततीसुध्दा अंधच निपजणार, अशी कारणे पुढे करून तिचा सासरच्या मंडळींनी सातत्याने शारीरिक व मानसिक छळ केल्याची फिर्याद सोलापुरात पोलिसांत दाखल झाली आहे.

डॉ. स्वाती धनराज करचे (वय २८, रा. फणसेवाडी, फलटण, जि. सातारा, सध्या रा. मुक्ता रेसिडेन्सी, जुळे सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा पती धनराज किसन करचे, सासरा किसन दगडू करचे, सासू शर्मिला करचे, दीर महेश करचे, जाऊ स्नेहल महेश करचे आणि चुलत सासू संगीता नाना करचे (रा. फालटण) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

डॉ. स्वाती हिचा विवाह गेल्या वर्षी झाला होता. काही दिवस सासरच्या मंडळींनी तिला चांगले वागविले. परंतु नंतर तुला डोळ्यांचा गंभीर आजार आहे. त्यावर कितीही उपचार केले तरी डोळे दुरूस्त होणार नसून तर तू कायमची आंधळी होणार आणि तुझ्या पोटी जन्माला येणारी अपत्येदेखील आंधळेच होणार, अशी कारणे पुढे करून शारीरिक व मानसिक छळ होऊ लागला. स्वाती हिने आपण वैद्यकीय डॉक्टर असल्यामुळे कोणत्याही दवाखान्यात नोकरी करू, असा प्रस्ताव ठेवला असता तिला वैद्यकीय व्यवसाय करण्यास मनाई करून घरात शयनगृहात एकटीला डांबून टाकण्यात येत असे. तिला लाथाबुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण करून अनेकवेळा उपाशी ठेवले जात असे. शेवटी स्वाती सोलापुरात माहेरी परतली.