सावंतवाडी : दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले गावात दिवसाढवळ्या एका शेतकऱ्यावर हत्तीने हल्ला केला. सुदैवाने, या हल्ल्यातून शेतकरी नामदेव सुतार आणि त्यांचं कुटुंब बचावले. मात्र, वनविभागाच्या हलगर्जीपणामुळेच ही घटना घडल्याचा आरोप करत स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. याआधी मोर्ले येथेच हत्तीने एका शेतकऱ्याला चिरडून ठार केल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतरही ‘ओंकार’ नावाच्या हत्तीला पकडण्याचा निर्णय शासनाने घेऊनही या कामात चालढकल केली जात असल्याचं दिसून येत आहे.

नामदेव सुतार हे मोर्ले येथील त्यांच्या काजूच्या बागेत काम करत असताना हत्तीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. सुदैवाने, ते आणि त्यांचं कुटुंब यातून बचावले. ही घटना वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे घडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी हत्तीचं लोकेशन चुकीचं दाखवलं, ज्यामुळे हा जीवघेणा प्रकार घडला.

वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

या घटनेनंतर वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मणेरी वनरक्षक शैलेश कांबळे यांनी हत्तीचं शेवटचं लोकेशन केर तळी येथे होतं असं सांगितलं. त्यांनी मोर्ले गावातील हत्ती अपडेट व्हॉट्सॲप ग्रुपवर ही माहिती दिली होती, पण त्या ग्रुपमध्ये कमी सदस्य असल्याने ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू शकली नाही.

साधनांची कमतरता आणि अधिकाऱ्यांची अनास्था

वनरक्षक कांबळे यांनी कबूल केलं की, त्यांच्याकडे दोन ड्रोन कॅमेरे असले तरी ते ऑपरेट करण्यासाठी फक्त एकच तंत्रज्ञ आहे. त्यांनी दीड महिन्यांपूर्वीच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आणखी एक ड्रोन आणि सहा ऑपरेटरची मागणी केली होती. त्यांच्या बोलण्यातून हत्ती पकडण्याच्या मोहिमेत वरिष्ठ अधिकारीच अनास्था दाखवत असल्याचं स्पष्ट झालं आहे.

जंगली हत्तींचा वावर आणि वन्य प्राण्यांचा हैदोस सुरू असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शेती व बागायती मध्ये वावरत असताना वन्यजीवापासून संरक्षणाकडे लक्ष द्यावे लागत आहेत. यावेळी उपसरपंच श्री. मोरये, माजी सरपंच पंकज गवस, माजी उपसरपंच नामदेव सुतार आणि अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त करत वनविभागाच्या ढिसाळ कारभारावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.