सावंतवाडी : नात्यागोत्यांनी पाठ फिरवली, पण सामाजिक बांधिलकीला जागून दोडामार्ग येथील नगरसेवक आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी एका ७६ वर्षीय महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करत माणुसकीचं दर्शन घडवलं. अर्पिता चिपळूणकर (वय ७६) असे या महिलेचे नाव असून, मालवणमधील नातेवाईकांनी अंत्यसंस्कारासाठी येण्यास नकार दिल्यानंतर ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, दोडामार्ग, सावंतवाडी येथे राहणाऱ्या अर्पिता चिपळूणकर यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मालवणमधील नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. मात्र, दुर्दैवाने त्यांनी अंत्यसंस्कारासाठी येण्यास स्पष्ट नकार दिला. ही माहिती मिळताच दोडामार्गचे नगरसेवक राजेश प्रसाद, स्वीकृत नगरसेवक समीर रेडकर आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. त्यांनी संवेदनशीलता दाखवत अर्पिता चिपळूणकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
नातेवाईकांचा नकार, नगरसेवकांनी दिला मदतीचा हात
अर्पिता चिपळूणकर या मूळच्या नानोडा, गोव्याच्या होत्या आणि त्यांचे लग्न मालवण येथे झाले होते. मात्र, त्या गेल्या काही वर्षांपासून तिकडे राहत नव्हत्या. दोन-तीन वर्षांपूर्वी त्या दोडामार्ग, सावंतवाडा येथील एका इमारतीत आपल्या एका पायाने अपंग असलेल्या बहिणीसोबत वास्तव्यास होत्या.
नातेवाईकांनी अंत्यसंस्कारासाठी नकार दिल्यानंतर, नगरसेवकांनी अर्पिता चिपळूणकर यांचा मृतदेह रात्री दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्याची व्यवस्था केली. त्यानंतर रविवारी सकाळी राजेश प्रसाद, समीर रेडकर यांच्यासोबत साई कुंदेकर, बळीराम सोनावणे, विनय देसाई, बाबू ताटे आणि नगरपंचायत कामगार यांनी दोडामार्ग स्मशानात अंत्यविधीसाठी लागणारी लाकडं आणि इतर साहित्य आणून सर्व विधी पूर्ण करत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.
नातेवाईकांनी नकार दिला असला तरी, या सर्व समाजसेवकांनी सामाजिक बांधिलकी जपत एकत्र येत अंत्यसंस्कार करून माणुसकीचं एक उत्तम उदाहरण घालून दिलं आहे.