राहाता : पतीने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन तिचा खून करून स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे उघडकीस आली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलीप मुजमुले व स्वाती मुजमुले (रा. चासनळी ता. कोपरगाव) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे. चासनळी येथील रहिवासी दिलीप मुजमुले हे चहाचा व्यवसाय करत होते तर त्यांची पत्नी स्वाती मुजमुले अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या. या दाम्पत्यामध्ये नेहमीच कौटुंबिक वाद होत असत आणि गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. दिलीप मुजमुले नशेत असल्यामुळे त्यांनी पत्नी स्वाती यांना मारहाण करून उशीने तोंड दाबून ठार मारले आणि त्यानंतर स्वत: पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळी घराचा दरवाजा उघडला नसल्याने शेजाऱ्यांनी आवाज दिला. परंतु, प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना शंका आली. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता, दिलीप मुजमुले पंख्याला लटकलेल्या अवस्थेत तर स्वाती मुजमुले जमिनीवर मृत पडलेल्या दिसल्या. शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिर्डी उपविभागीय अधिकारी अमोल भारती, कोपरगावचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
घरातील भिंतीवर लिहिली शेजारच्यांची नावे
पोलिसांना तपास करताना असे आढळून आले की, मृत दिलीप यांनी घरातील भिंतीवर खडूने शेजारील कुटुंबातील व्यक्तींची नावे लिहिली होती आणि ‘हे कुटुंब मला कायम त्रास देत आहे’ असा मजकूर लिहिला होता. या मजकुरामुळे पोलिसांनी शेजारील कुटुंबातील व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.