ज्येष्ठ समाजसेवक अनिल अवचट, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. मोहन आगाशे, शिक्षण तज्ज्ञ रमेश पानसे, संगीतकार एन. राजम, चित्रकार सुहास बहुलकर आणि अंध गिर्यारोहक नेहा पावसकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारे या वर्षांचे ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार जाहीर झाले आहेत.
पुरस्काराचे यंदा १२ वे वर्ष असून रूपये २१ हजार व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येथील महाकवी कालिदास कलामंदिरात १० मार्च रोजी पुरस्कार प्रदान सोहळा होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यंदा लोकसेवा विभागात ‘मुक्तांगण’च्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी सतत कार्यरत ज्येष्ठ समाजसेवक व लेखक डॉ. अनिल अवचट यांना तर, व्हायोलिनवरील कमालीच्या प्रभुत्वामुळे अर्धशतकापासून रसिकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या डॉ. एन. राजम यांना संगीत-नृत्य विभागासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. वडील नारायण अय्यर आणि कंठ संगीताचे मुकूटमणी पं. ओंकारनाथ ठाकूर यांच्या मार्गदर्शनामुळे डॉ. राजम यांनी व्हायोलिनमध्ये नवीन क्षितिज धुंडाळले. नाटय़ विभागात ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. मोहन आगाशे यांची निवड करण्यात आली आहे.
ज्ञान विभागासाठी आदिवासी भागात शिक्षण व पायाभूत सुविधा उभारत आदिवासी मुलांच्या दैनंदिन जीवनास अनुसरून शिक्षण व्यवस्था उभारणाऱ्या रमेश पानसे यांना तर, साहस विभागासाठी हिमालयाच्या झोंगरी शिखरापर्यंत मजल मारणाऱ्या अंध गिर्यारोहक नेहा पावसकर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. चित्र-शिल्प विभागात ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुलकर यांची निवड करण्यात आली आहे. व्यक्तीचित्रणात बहुलकर यांचे विशेष नाव आहे.. पत्रकार परिषदेस प्रतिष्ठानचे कार्यवाह लोकेश शेवडे, विश्वास ठाकूर, अॅड. विलास लोणारी आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jan 2014 रोजी प्रकाशित
डॉ. मोहन आगाशे, अनिल अवचट आदींना ‘गोदावरी गौरव’
ज्येष्ठ समाजसेवक अनिल अवचट, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. मोहन आगाशे, शिक्षण तज्ज्ञ रमेश पानसे, संगीतकार एन. राजम, चित्रकार सुहास बहुलकर आणि अंध गिर्यारोहक
First published on: 28-01-2014 at 01:42 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr mohan agashe anil awachat get godavari gaurav award