कोल्हापूर : लोकराजे राजर्षी शाहू महाराज सर्व समावेशक कृतिशील विचारवंत व राजे होते. त्यांनी आपल्या राज्यामध्येच आजच्या लोकशाहीचा पाया मजबूत केला, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
गडहिंग्लज येथील शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष, ज्येष्ठ लेखक, प्रा. किसनराव कुराडे लिखित छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जडणघडणीतील वेगळे पैलू मांडणारा “स्वयंभू यशवंतराव घाटगे संस्थानिक शाहू महाराज झाले नसते, तर…” या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, आजच्या भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया राजर्षी शाहूंच्या विचार कृतीतून झालेली दिसून येते. आजच्या मूलतत्ववाद्यांना रोखण्यासाठी राजर्षी शाहूंचा मानवतावाद जोपासला तर मानवी समाजाची प्रगती होऊ शकते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रशांतकुमार कांबळे, हिंदुराव हुजरे-पाटील, अनिल म्हमाने, डॉ. शोभा चाळके यांची भाषणे झाली. प्रास्ताविक प्रकाशक अनिल म्हमाने, सूत्रसंचालन वैभव प्रधान, आभार डॉ. शोभा चाळके यांनी मानले.