अहिल्यानगरः गेल्या आठवड्यापासून जिल्ह्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असला तरी प्रत्यक्षात जिल्ह्यात अजूनही १७८ टँकरने ३.५ लाख लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी टँकरची संख्या १८१ होती, ती कमी होऊन १७८ झाली आहे. जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम प्रकल्पातील पाणीसाठे गेल्या वर्षीच्या तुलनेत काहिसे अधिक आहेत.
हवामान विभाग जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. मात्र, हवेतील उष्मा कमी झालेला नाही. अवकाळीने मात्र जिल्ह्यात भाजीपाल्यासह पिकांचे नुकसान होत आहे. तसेच वादळीवारे व वीजांमुळे मणुष्यहानी व जनावरे दगावत आहेत. गेल्या फेब्रुवारी अखेरपासून जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा लागला आहे. सध्याही गेल्या आठवड्यापासून कमीअधिक स्वरूपाचा मान्सूनपूर्व पाऊस जिल्ह्यात कोसळत आहे. मात्र, त्याचा अपेक्षित परिणाम अद्याप दिसत नसल्याने टँकरची मागणी कमी झालेली नाही. जिल्ह्यात सध्या १६३ गावे, ८८८ वाड्यावस्त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत. पाथर्डी, पारनेर, अहिल्यानगर, संगमनेर, अकोले, शेवगाव तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी असली तरी तेथे टँकरची संख्याही अधिक आहे.
सध्या पाथर्डीत ५४ टँकरद्वारे ३६ गावे, २०९ वाड्यावस्त्यांवरील ९४ हजार ५१४ लोकांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. जामखेडमध्ये सात गावांतील ९ हजार ७३६ लोकांना सात टँकर, कर्जतमधील १६ गाव १०४ वाड्यावस्त्यांना १७ टँकरच्या माध्यमातून ३ हजार ३७६ लोकांची तहान भागवली जात आहे. शेवगावमध्ये ११ टँकरद्वारे १४ गावे ८६ वाड्यावस्त्यातील १९ हजार ४९३ लोकांना, पारनेरमधील ३८ गावे, २९४ वाड्यावस्त्यांवरील ८१ हजार ८०३ लोकांना ३९ टँकरद्वारे, श्रीगोंदा येथील १ गावासाठी २ टँकर सुरू आहेत. तेथे ८ हजार ७६० लोकांची तहान भागवली जात आहे.
नेवासामधील ३ गावे, ३० वाड्यावस्त्यांवरील ६ हजार ५९५ लोकांना तीन टँकरद्वारे, अहिल्यानगर तालुक्यातील १९ गावे ७७ वाड्यावस्त्यांना १८ टँकरद्वारे ३७ हजार ६२७ लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. अकोले तालुक्यातील ३ गावे २५ वाड्यावस्त्यावरील ९ हजार २३४ लोकांची तहान भागवली जात आहे. संगमनेरमध्ये २६ गावे, ९३ वाड्यावस्त्यांना २० टँकर सुरू आहेत. तेथे ३ हजार ६५१ लोकांना टँकरद्वारे पाणी दिले जात आहे.
यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील भुजलात गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत घट झाल्याचे आढळत आहे. त्यामुळे गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस होऊनही यंदा टँकरची संख्या तुलनेत वाढलेली आहे.
धरणातील जलसाठ्याची टक्केवारी
जिल्ह्याची तहान भागवणारे ३ मोठे व ६ मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पातून गेल्यावर्षीच्या तुलनेत काहीसा अधिक साठा आहे. त्याची आकडेवारी पुढीलप्रमाणे (कंसात गेल्यावर्षीची टक्केवारी): भंडारदरा २९.५५ (१२.२९), मुळा ३२.७७ (२५.३२), निळवंडे २४.७७ (१३.०४), आढळा ४६.६० (३८.०२), मांडवहोळ १५.१९ (६.३७), पारगाव घाटशीळ ० (०), सीना २६.३८ (१७.२१), खैरी १६.३१ (१३.२४) व विसापूर १४.६९ (४.६९).