अवेळी व कमी पावसामुळे मराठवाडय़ात खरीप पिकांची उत्पादकता कमालीची घटली. रब्बी हंगामातही केवळ ८ टक्के पेरणी झाली. परिणामी नव्या सरकारसमोर मराठवाडय़ातील दुष्काळाचे मोठे संकट असल्याचेच चित्र आहे. मुख्य सचिवांनी या अनुषंगाने सोमवारी व्हिडिओ कॉन्फरिन्सगद्वारे आढावा घेतला.
मराठवाडय़ात कापसाची उत्पादकता हेक्टरी ९ क्विंटलची आहे. ती केवळ ५ ते ६ क्विंटलवर आली आहे. कापूसच नाही, तर सोयाबीन पिकाच्या उत्पादकतेतही कमालीची घसरण झाली. हेक्टरी १० क्विंटलची उत्पादकता ३ ते ४ क्विंटलवर घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. परतीचा पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे ज्वारीचे उत्पादन लक्षणीय घटेल. रब्बी ज्वारी, हरभरा, गहू, मका ही पिके येतील का, असाच प्रश्न आहे. या पाश्र्वभूमीवर हे संकट भीषण असल्याचे ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक सतीश शिरडकर यांनी सांगितले. िहगोली, लातूर जिल्ह्यांत उत्पादकतेचे प्रश्न निर्माण झाले आहे. परतीचा पाऊस न झाल्याने शेतीव्यवसायच धोक्यात आला आहे. येत्या काही दिवसांत अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची ओरड सुरू होईल. औरंगाबाद व जालना शहरांत पिण्याच्या पाण्याची तीव्रता अधिक भासणार नाही. जायकवाडीत पुरेसा पाणीसाठा असल्याने शहराला पिण्याच्या पाण्याची अडचण जाणवणार नाही. तथापि ग्रामीण भागात हे संकट अधिक तीव्र असेल.
संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी आढावा बठकांचे सत्र सुरू झाले आहे. दुष्काळाचे संकट असले, तरी औरंगाबाद जिल्ह्यात खरीप पीक पसेवारी मात्र ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे दुष्काळ नाही, असे चित्र यंत्रणा निर्माण करीत आहे. घटलेली उत्पादकता हा चिंतेचा विषय असल्याने अर्थकारण आक्रसेल, असे सांगण्यात येते. औरंगाबाद बाजार समितीत दिवाळीनंतर दिसणारी शेतकऱ्यांची गर्दी अजूनही दिसत नाही. आतापर्यंत केवळ १७ हजार ५०८ क्विंटल धान्याची आवक झाली.
मराठवाडय़ातील नजर पसेवारीत दुष्काळ दिसत नसला, तरी पीककापणी अहवालात उत्पादकता घटल्याचे दिसून आले आहे. मराठवाडय़ातील साडेपाच हजार गावांमध्ये पीककापणी झाली. उर्वरित गावांमध्ये ही प्रक्रिया १५ नोव्हेंबपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या मराठवाडय़ात २७ टँकरने पिण्यास पाणी पुरविले जात आहे. फेब्रुवारीपर्यंत चाऱ्याची अडचण येणार नाही, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drought trouble in aurangabad
First published on: 04-11-2014 at 01:30 IST