राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईतील फोर सिझन हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्ट्या होत असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यानंतर आता या प्रकरणामध्ये भाजपाचे नेते नितेश राणे यांनी नवाब मलिक यांना उत्तर दिलं आहे. हे उत्तर देताना नितेश राणे यांनी या ड्रग्ज प्रकरणावरील प्रश्नावरुन थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये नितेश राणेंनी राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांना फोर सिझनमधील पार्ट्यांबद्दल माहिती आहे. नवाब मलिकांनी त्यांच्याकडून माहिती घ्यावी असं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“नवाब मलिक आणि संजय राऊत यांनी रोज पत्रकार परिषद घ्यावी. जेवढं ते बोलतायत तेवढी ते महाविकास आघाडीची कब्र खोदत चालले आहेत. याचं आम्हाला निश्चित समाधान आहे. तुम्हाला फोर सिझनमधील पार्ट्यांची माहिती हवी असेल तर तुम्ही त्यांच्या पर्यावरण मंत्र्यांना विचारा. फोर सिझनमध्ये पार्ट्या कशा व्हायच्या कोणाबरोबर व्हायच्या याची माहिती मंत्रीमंडळातील पर्यावरण मंत्र्यांकडे चांगल्या पद्धतीने आहेत,” असं नितेश राणे म्हणाले आहेत.

पुढे बोलताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख ‘लहान मुलगा’ असा केला आहे. “आजूबाजूला विचारण्यापेक्षा त्यांनी (नवाब मलिकांनी) कॅबिनेटमध्ये बाजूला बसलेल्या लहान मुलाला विचारलं की तू बाबा फोर सिझनमध्ये काय करायचा? तर तो आमच्यापेक्षा जास्त माहिती देऊ शकतो,” असं नितेश राणे म्हणालेत. “फोर सिझनमध्ये ते जायचे यायचे. त्यांना चांगली माहिती असेल. मग त्यांनी ती नवाब मलिकांना द्यायला पाहिजे ना की काय चाललंय फोर सिझनमध्ये ते. फार लांब जायची गरज नाही,” असा टोलाही नितेश यांनी लगावलाय.

तसेच नवाब मलिक हे फोर सिझनमधील सीसीटीव्ही फूटेज दाखवणार असल्याच्या मुद्द्यावरुन प्रश्न विचारण्यात आला असता नितेश राणेंनी आपणही सीसीटीव्ही फूटेज द्यायला तयार असल्याचं म्हटलंय. “नवाब मलिकांनी एक सीसीटीव्ही फूटेज दाखवावं मग मी पण दुसरं सीसीटीव्ही फुटेज देतो. कोण कुठे बसायचं आणि कोण कुठल्या टेबलवर असायचं. डिनोबरोबर मांडीला मांडी लावून कोण बासायचं ही मी पण माहिती देऊ शकतो. नवाब मलिकांना माहिती हवी असेल तर देतो. अजून खोदायचं असेल महाविकास आघाडीला अजून खाली टाकायचं असेल तर महिती द्यायला तयार आहे मी,” असं नितेश राणे म्हणालेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drugs case nitesh rane says nawab malik should ask environment minister about parties at four season hotel scsg
First published on: 02-11-2021 at 16:37 IST