‘अनलॉक’च्या निर्णयावर गोंधळ का झाला?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

परिस्थिती पाहून अनलॉक करण्यासाठी प्रशासनाला मदत व्हावी म्हणून सरकारने निकष निश्चित केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

maharashtra unlock guidelines uddhav thackeray clarifies vijay wadettiwar
'अनलॉक'च्या गोंधळावरून सरकारवर टीका होत असतानाच ठाकरे सरकारने शुक्रवारी रात्री आदेश काढत या गोंधळावर पडदा टाकला. निर्माण झालेल्या या गोंधळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.

राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्याच्या निर्णयावरून दोन दिवसांपूर्वी गोंधळ उडाला होता. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात पाच टप्प्यात अनलॉक करण्यात येत असल्याची घोषणा केली होती. मात्र, मुख्यमंत्री कार्यालयाने असा निर्णय झालेला नसल्याचं म्हटलं होतं. या गोंधळावरून सरकारवर टीका होत असतानाच ठाकरे सरकारने शुक्रवारी रात्री आदेश काढत या गोंधळावर पडदा टाकला. दरम्यान, या गोंधळावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः सरकारची भूमिका स्पष्ट केली.

महाराष्ट्रातील सद्यःस्थिती आणि भविष्याचा वेध घेणारा ‘दृष्टी आणि कोन’ हा कार्यक्रम ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात आज (५ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. “तीन पक्षाचं सरकार कधी येऊ शकेल हा विचार माझ्याही मनात कधी आला नव्हता. हे राजकीय अकल्पित घडावावं लागलं. करोना संकटामुळे राजकीय पक्षाचं बळ असलेल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचता येत नाही. गावपातळीवर हा एकोपा करण्याचा कार्यक्रम प्रत्यक्ष सुरू करता आलेला नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“शिवसेना मनापासून काम करतेय. भाजपासोबत असतानाही शिवसेनेनं काम केलं. युतीतून बाहेर पडण्याचा विचार नव्हता. पण आता आघाडी झालीये. चांगली कामं करण्यासाठीच एकत्र यायचं आहे. मग युती असो किंवा आघाडी. आमचा हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक असेल, तोपर्यंत आघाडी कायम राहणार आहे. आमच्यात जर कुरबुरी असत्या, तर हे सरकार चाललंच नसतं. हे सरकार स्थापन झालं, तेव्हा सगळ्यात नवखी व्यक्ती फक्त मुख्यमंत्री म्हणजेच मी होतो. मी कधीच विधिमंडळात गेलेलो नव्हतो, असं असतानाही सरकार चांगलं काम करत आहे,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा : “…तोपर्यंत ही महाविकासआघाडी टिकणार!” मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास!

एका विचारावर झालेली युती का तुटली?

“प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत एक कौटुंबिक नातं होतं. नरेंद्र मोदी यांच्यासोबतही चांगलं नातं आहे. नात्यामध्ये राजकारण का आणायचं?, असं सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, “भाजपा-शिवसेना एकत्र येणार का? याचं उत्तर शोधायचं असेल, तर भूतकाळात डोकवावं लागेल. वेगळं का व्हावं लागलं? हे शोधावं लागेल. हिंदुत्वावर निवडणूक लढवणारा पक्ष शिवसेना आहे. यात बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला गेला. त्यावेळी भाजपा-शिवसेना हे दोन्ही पक्ष अस्पृश्य होते. पण एक वेड दोन्ही पक्षांमध्ये होतं. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही वाईट काळात एकत्र होतो. मग चांगलं चाललं असताना का वेगळे का झालो? हे का घडलं? हा प्रश्न जनतेलाही पडला आहे. एका विचारावर झालेली युती तुटली का? हा प्रश्न आहेच,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

धर्म राजकारणापासून लांब ठेवायला हवा? धर्म राजकारणापासून दूर ठेवायचा असेल, तर प्रबोधनकार ठाकरे, संत गाडगेबाबा यांनी जो सांगितलाय तो धर्म. भूकेल्याला भाकरी, तहानलेल्या पाणी हा आपला राजकारणं. साधू संतांनी जी शिकवण दिली ते, हिंदुत्व. धर्माचा आधार घेण्यात चूक काय. त्याचा आधार घेऊन राजकारण करणं चूक काय. साधूसंतांनी जगावं कसं, याचा धर्म सांगितला,” उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – मराठा आरक्षण : मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसलोय म्हणून मला आरोप करणं शोभणारं नाही -उद्धव ठाकरे

“विजय वडेट्टीवारांचा गैरसमज झाला”

“गेल्यावेळी लॉकडाउन शब्द वापरला नाही, पण निर्बंध लॉकडाउनसदृश्य लागू करावे लागले. मागच्या वेळी १५ दिवस उशीर झाला. गेल्या वेळी सगळ्यांना विश्वासात घ्यावं लागलं. सगळ्यांशी बोलण्यात वेळ गेला. त्यामुळे हे निकष लागू केले. अजूनही निर्बंध उठवल्याचं जाहीर केलेलं नाही. स्थानिक प्रशासन हा निर्णय घेणार आहे. प्रशासनाला मदत होण्यासाठी हे निकष ठरवण्यात आले आहेत. कारण प्रशासनाला परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेता यावा, म्हणून हे करण्यात आलं आहे. पण, निर्बंध उठवण्यात आलेले नाहीत. आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक होती. त्यात दहावी-बारावी परीक्षेच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यात हे निकष सूचवण्यात आले. त्यात विजय वडेट्टीवारांचा गैरसमज झाला. त्यांना वाटलं निर्णय निश्चित झाला आहे. त्यामुळे त्यांनी जाहीर केलं. पण प्रशासनाला आढावा घेण्याची सूचना त्यावेळीच करण्यात आली होती,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Drushti ani kon loksatta with uddhav thackeray maharashtra unlock guidelines cm clarifies on unlock vijay wadettiwar bmh