सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचे मत
सहकारी संस्थांमध्ये प्रशिक्षित कर्मचारी नसतात त्यामुळे सहकारी संस्थांमध्ये भोंगळ कारभार सुरू असतो, याला सर्वस्वी संस्थांचे संचालक जबाबदार आहेत. संचालक कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला महत्व देत नाहीत, असे परखड मत महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी व्यक्त केले.
सहकार भारती, रायगड आणि सहकार भारती सहकार प्रशिक्षण सहकारी संस्था, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्य़ातील सहकारी पतसंस्थांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम भाग्यलक्ष्मी हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ‘मानव संसाधन विकास’ या विषयावरील व्याख्यानात शेखर चरेगावकर बोलत होते. चरेगावकर म्हणाले की, जनेतच्या गरजा ओळखून तशा सेवा देण्यासाठी सहकारात सतत संशोधन होणे गरजेचे आहे. सहकारी संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांना चांगले प्रशिक्षण देऊन त्यांच्यात संशोधन वृत्ती वाढवली पाहिजे.
कर्मचारी हा केवळ अंमलबाजाणी करण्यापुरता न राहता त्याला संस्थेच्या योजना बनवता आल्या पाहिजेत. कर्मचाऱ्यांच्या क्षमता वाढविण्यासाठी अनुभवी कर्मचाऱ्यांची फळी निर्माण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिले पाहिजे.
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था महासंघाच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था महासंघाचे अध्यक्ष काका कोयटे, सहकार भारतीचे राष्ट्रीय चिटणीस डॉ. प्रा. उदय जोशी, महाराष्ट्र राज्य पतसंस्था वेल्फेअर असोसिएशनचे मुख्य प्रवर्तक रामभाऊ लेंभे, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था महासंघाचे खजिनदार दादाराव तुपकर, उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव, महासचिव डॉ. शांतिलाल सिंगी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.