केंद्र सरकारने इथेनॉलबाबत चांगले धोरण आणलं आहे. पूर्वी पेट्रोलमध्ये ५ टक्के सुद्धा इथेनॉलचे मिश्रण केले जात नसायचं. आता सरकारने नवा अध्यादेश काढला आहे. त्यानुसार मार्च २०२३ साली २० टक्के तर मार्च २०२५ साली २५ टक्के इथेनॉलचे मिश्रण पेट्रोलमध्ये केले जाणार आहे. त्यामुळे २० ते २५ रुपयांनी पेट्रोल ग्राहकांना स्वस्त मिळेल, अशी माहिती भाजपाचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, “देशात कच्च्या तेलासाठी दीड ते दोन लाख कोटींची परकीय गुंतवणूक करावी लागते. ती इथेनॉलच्या निर्मितीमुळे थांबणार आहे. मागील वर्षी केंद्र सरकारने ५०० कोटी लीटर इथेनॉलच्या निवीदा काढल्या होत्या. त्यातील ४१० कोटी लीटर इथेनॉलचा पुरवठा करण्यात आला. तर, १७० कोटी लीटर इथेनॉलचा पुरवठा फक्त महाराष्ट्राने केला आहे. साखर कारखाने हे इंधन निर्मितीचे स्रोत बनले आहेत,” असेही पाटील यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“देशात महाराष्ट्रातून ३० टक्के इथेनॉल पुरवले जाते. तर, २५ टक्के उत्तर प्रदेश, २० टक्के कर्नाटक, १० टक्के इथेनॉलचा गुजरातमधून पुरवठा होतो. जम्मू-काश्मीर, बिहार, आसाम, हिमाचल प्रदेशमध्ये साखर कारखान्यांचे प्रमाण अगदी नगण्य आहे. त्यामुळे त्या राज्यांना महाराष्ट्रातून इथेनॉल पुरवठा करावा लागेल,” असेही हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं.