शहर काँग्रेसकडून व्यापाऱ्यांच्या स्वाक्षरीची मोहीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगर : शहराच्या बाजारपेठेतील रस्ते ‘धुळमुक्त व खड्डेमुक्त करा’ या मागणीसाठी शहर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज गुरुवारी व्यापाऱ्यांशी संवाद साधत स्वाक्षरी मोहीम राबवली. यामध्ये १ हजाराहून अधिक व्यापाऱ्यांनी स्वाक्षरी करत  प्रतिसाद दिल्याचा दावा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला. काळे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी मनोज गुंदेचा, खलील सय्यद, दशरथ शिंदे, अनंतराव गारदे, प्रवीण गीते, अनीस चुडीवाल, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, जितेंद्र तोरणे, विशाल घोलप, उषा भगत, राणी पंडित,   हेमलता घाडगे आदी मोहिमेत सहभागी झाले होते. मनपा आयुक्तांनी शहरातील १०० रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण झाल्याचा दावा केला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ही मोहीम राबवली.

यासंदर्भात काळे यांनी सांगितले, की काँग्रेसच्या पाहणीत बाजारपेठेतील एकही रस्ता आयुक्तांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमातील नाही. त्यामुळे आयुक्त हे खोटारडे असून नगरकरांची फसवणूक करत आहेत. व्यापाऱ्यांशी संवाद साधताना काळे म्हणाले, काँग्रेस जरी आज महापालिकेत व शहरात सत्तेत नसला तरी व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवेल. बाजारपेठ धुळमुक्त व खड्डेमुक्त झाली पाहिजे. मनपाचे अधिकारी, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी झोपेचे सोंग घेतले आहे. कामामध्ये टक्केवारी मागण्यात बरबटले आहेत. त्यांच्याकडून चांगल्या कामाची काय अपेक्षा करणार? व्यापाऱ्यांच्या सह्यांच्या निवेदनासह काँग्रेसचे शिष्टमंडळ मनपा आयुक्तांची भेट घेऊन व्यापाऱ्यांच्या भावना व मागण्या मांडणार आहे. मनपाने यावर तातडीने तोडगा न काढल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

उद्ध्वस्त बाजारपेठेवर कोणाचा हल्ला?

मोहिमेत काँग्रेसतर्फे बाजारपेठेत पत्रकेही वितरीत करण्यात आली. त्यात म्हटले की, चितळे रस्ता, तेलीखुंट, दाळमंडई, कापड बाजार या बाजारपेठा ‘रस्तेमुक्त’ झाल्या आहेत. कोठेही रस्ता दिसत नाही. रशियाने युक्रेनवर बॉम्बहल्ले केल्याचे आपण पाहतो, मात्र शहरातील बाजारपेठेवर नेमका कोणी हल्ला केला? त्यामुळे येथील रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत, याचा व्यापाऱ्यांनी अंतर्मुख होऊन शोध घेण्याची गरज आहे. बाजारपेठेची आजची भयानक स्थिती ही मनपा निर्मित असून मनपाने हा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. ज्यांच्यावर जबाबदारी आहे, त्यांनी मात्र आपल्या डोळय़ांना पट्टय़ा अन् कानांत बोळे घातले आहेत. त्यामुळे बाजारपेठेची भग्नावस्था त्यांना दिसत नसून व्यापाऱ्यांचा आक्रोश ऐकू येईनासा झाला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dust town market signature campaign traders city congress ysh
First published on: 04-03-2022 at 00:02 IST