इंदौरच्या ईगल सीडस् कंपनीचे चिखलीच्या चार गोदामात सील करण्यात आलेले २१ हजार ३०० क्िंवटल सोयाबीन बियाणे पेरणीसाठी अयोग्य असल्याचा निर्वाळा नागपूरच्या बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे या बियाणे विक्रीस प्रतिबंध व संबंधित कंपनीविरोधात कायदेशीर कारवाईचा पवित्रा कृषी विभागाला घ्यावा लागणार आहे. कंपनीविरोधातील फौजदारी कारवाईस कायद्याच्या अडचणी येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
राज्य बियाणे गुणवत्ता नियंत्रण कक्षाचे पुणे येथील अधिकारी दिलीप झेंडे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रमेश भराड, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अमित पाटील, मोहिम अधिकारी अनंत चोपडे यांच्या नेतृत्वाखालील एका संयुक्त पथकाने चिखली येथील ईगल सीडस् कंपनीच्या चार गोदामांवर छापे घालून तेथे साठविण्यात आलेले २१ हजार ३०० क्िंवटल सोयाबीन बियाणे सील केले होते. या बियाण्यांच्या उगवण क्षमतेबद्दल कृषी खात्याने शंका व्यक्त करून या बियाण्यांचे २६ नमुने नागपूरच्या केंद्रीय बियाणे चाचणी प्रयोगशाळेत पाठविले होते. या बियाणे चाचणीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून बियाण्यांची उगवण क्षमता ७० टक्क्यापेक्षा कितीतरी कमी आहे. त्यामुळे हे बियाणे पेरणीस अयोग्य असल्याचे प्रयोगशाळेने कृषी विभागास स्पष्टपणे कळविले आहे. कृषी विभागाने ईगल कंपनीस हे बियाणे विक्रीस मनाई केली आहे. ईगल सीडस् कंपनीवर बियाणे नियंत्रण कायदा १९८३ नुसार कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.