भगवान मंडलिक, लोकसत्ता
डोंबिवली- वर्ष उलटून गेले आता डोंबिवलीतील रेरा घोटाळ्यातील ६५ बेकायदा इमारत प्रकरणाची चौकशी होत नाही. याप्रकरणाची चौकशी करणारे पोलिसांचे विशेष तपास पथक थंडावले आणि सक्तवसुली संचालनालयाकडूनही (ईडी) कारवाई होत नाही, या अविर्भावात असलेल्या भूमाफिया, वास्तुविशारद आणि जमीन मालकांना ‘ईडी’ने या प्रकरणाचा गतिमानतेने तपास सुरू करून जोरदार दणका दिला आहे. बेकायदा बांधकामे प्रकरणातील वास्तुविशारदांची इत्यंबूत माहिती दाखल करण्याचे आदेश ‘ईडी’ने ‘द इंडियन इन्स्टिट्युट ऑफ आर्किटेक्ट’ संस्थेच्या (महाराष्ट्र) पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
याप्रकरणातील तक्रारदार वास्तुविशारद संदीप पाटील आणि ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने अशाप्रकारची चौकशी सुरू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदयाने ईडी ६५ बेकायदा बांधकाम घोटाळ्याची चौकशी करणार आहे.
हेही वाचा >>> बदलापूर : सलग दुसऱ्या आठवड्यात वणवा सत्र; समाजकंटांनी वणवा लावल्याचा संशय
मे. गोल्डन डायमेंशन (नोंदणी क्र. ८४८१७२), वास्तु रचना (नों.क्र. सीए ८६०९०७९) या वास्तुविशारद संस्थांचे वास्तुविशारद संघटनेकडे असलेले नोंदणीकरण, त्यांचे पत्ते, या संस्थेशी संबंधित वास्तुविशारदांची नावे, त्यांचे मोबाईल क्रमांक ही माहिती तातडीने ‘ईडी’ने वास्तुविशारद संघटनेकडून मागविली आहे. ६५ बेकायदा प्रकरणात १८ बेकायदा इमारतींचे आराखडे ‘मे. गोल्डन डायमेंशन’ यांनी, १३ इमारतींचे आराखडे ‘वास्तु रचना’ संस्थेने तयार केले आहेत. ही सर्व बांधकामे २७ गाव, डोंबिवलीत विविध भागात उभारण्यात आली आहेत.
६५ इमारती उभारताना माफियांनी पैसा कौठुन उभा केला. सदनिका विक्रीनंतरचा पैसा कोठे जिरवला. शासनाचा महसूल, वस्तु व सेवा कर, प्राप्तिकर या करांची पूर्तता माफियांनी केली का, अशा अनेक बाजुने आम्ही या प्रकरणाची चौकशी करणार आहोत, असे ईडीच्या एका वरिष्ठाने ‘लोकसत्ता’ला सांगितले.
सर्वोच्च १० माफिया रडारवर
डोंबिवली, २७ गाव परिसरात अनेक वर्षापासून बेकायदा बांधकामांत सक्रिय असलेल्या सर्वोच्च १० भूमाफियांची माहिती तक्रारदार पाटील यांनी ईडीला दिली आहे. बांधकामे उभी करताना पालिका, पोलीस अधिकारी या बांधकामांची कशी पाठराखण करतात. या बेकायदा बांधकामांमध्ये माफियांबरोबर निवृत्त पोलीस अधिकारी, पालिका कामगार, अधिकारी यांचा कसा सहभाग आहे. याची सविस्तर माहिती पाटील यांनी ईडी अधिकाऱ्यांना दिली. याप्रकरणी पाटील यांचा ईडीकडून पुन्हा नव्याने सविस्तर जबाब नोंदविण्याची कार्यवाही लवकरच केली जाणार आहे, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
गुन्हेगार पाश्वभूमी असलेला एक इसम डोंबिवलीत वास्तुविशारदांची संस्था चालविते. या इसमाला गेल्या वर्षी एका लोकप्रतिनिधीने शस्त्र परवाना घेऊन दिला आहे. नांदिवली पंचानंद येथील बेकायदा इमारत घोटाळ्यातही हा इसम आरोपी आहे.
हेही वाचा >>> कल्याण मधील बालिकेची मुरबाड जवळील भैरव गड चढण्याची मोहीम यशस्वी
अहवालात फेरफार
ईडीने सहा तक्त्यामध्ये ६५ बेकायदा प्रकरणाची माहिती कल्याण डोंबिवली पालिका आयुक्तांकडून मागविली होती. बांधकामे कधी उभी राहिली. तो कालावधी, जमीन मालक, भूमाफिया, वास्तुविशारद, त्या कालावधीतील अधिकारी अशी ही माहिती होती. पालिकेच्या नगररचना कर्मचाऱ्यांनी ६५ बांधकामांच्या ठिकाणी जाऊन माहिती संकलित करुन अहवाल तयार केला. हा अहवाल ईडीपुढे सादर करताना पालिका अधिकाऱ्यांनी आपल्या उपायुक्त, साहाय्यक आयुक्त, बीट मुकादम अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी काही फेरफार केले आहेत. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी तक्रारदार पाटील यांनी ईडीकडे केली आहे. नगररचना कर्मचाऱ्यांनी ईडीकडून आमची चौकशी झाली तर वास्तवदर्शी माहिती त्यांच्यासमोर ठेवणार आहोत, असे स्पष्ट केले.
“ईडीने दिलेल्या तक्त्याप्रमाणे बांधकामांची माहिती दाखल केली आहे. यामध्ये कोणतेही बदल केले नाहीत.”
सुधाकर जगताप, उपायुक्त अतिक्रमण नियंत्रण
“ ईडीने चौकशी सुरू केल्याने ६५ बेकायदा बांधकामांमधील खरे म्होरे आता पुढे येतील. खरा गुन्हेगार मग तो पालिका अधिकारी, माफिया, जमीनमालक, दस्त नोंदणी अधिकारी, वास्तुविशारद असो त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, ही आपली यापुढे भूमिका आहे.”
संदीप पाटील, वास्तुविशारद