कर्जत : ‘व्हीआयपीजी’ ग्रुपच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक गुन्ह्यातील आरोपींच्या कर्जत तालुक्यातील आंबीजळगावातील नातलगांच्या घरी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापा टाकला आहे. या संदर्भातील गुन्हा पूर्वीच पुणे जिल्ह्यात दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्यात किरण पितांबर अनारसे हा आरोपी आहे, त्याच्या भावाच्या घरी छापा टाकून अधिकाऱ्यांनी दहा ते बारा तास चौकशी केली.
कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील विनोद खुटे याने मेसर्स व्हीआयपीजी या नावाने कंपनी स्थापन करून गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये जमा केले. याची व्याप्ती नगर जिल्ह्यासह राज्याबाहेरही आहे. याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने आतापर्यंत विविध ठिकाणी छापे टाकून कंपनीच्या ७५ कोटी ४२ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. आंबीजळगाव येथे याच तपासासाठी ही कारवाई करण्यात आली.