वसुली प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) ताब्यात घेतलेले महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात, ईडीने आता अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषीकेश देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. ऋषीकेश देशमुखला शुक्रवारी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार ईडीने याआधीच अनिल देशमुख यांना अटक केली असून, सध्या ते सहा नोव्हेंबरपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ईडीच्या म्हणण्यानुसार, बडतर्फ करण्यात आलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेने बार सुरळीत चालवण्यासाठी मुंबईतील ऑर्केस्ट्रा बारमालकांकडून ४.७ कोटी रुपये उकळले आणि ही रक्कम देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना दिली, जे नंतर नागपूरला गेले आणि त्यांनी एका व्यक्तीला है पैसे सोपवले. ईडीच्या अधिका-यांनी सांगितले की, त्याच्या तपासात असे समोर आले आहे की हवाला चॅनेलद्वारे पैसे दिल्लीस्थित सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन यांना पाठवले गेले होते, जे बनावट कंपन्या चालवत होते. जैन बांधवांनी हे पैसे नागपूरच्या श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टला दान केल्याचा आरोप आहे.

अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषीकेश देशमुख यांच्या सूचनेनुसार जैन बंधू हे काम करत असल्याचा ईडीच्या अधिकाऱ्यांना संशय आहे आणि त्यामुळेच त्यांना ऋषीकेश देशमुख यांचा जबाब नोंदवायचा आहे. ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ऋषीकेश आणि त्यांचे वडील देशमुख यांना समोरासमोर आणू शकते आणि दोघांची एकत्र चौकशी केली जाऊ शकते. मात्र, देशमुख यांच्या मुलाला अटक होणार की नाही, हे ईडी चौकशीनंतरच ठरवू शकणार आहे.

ऋषीकेश देशमुख यांना यापूर्वीही दोनदा एजन्सीने बोलावले होते. पण त्याच्या वडिलांप्रमाणेच तेही मनी लाँड्रिंगच्या चौकशीसाठी केंद्रीय पथकासमोर हजर राहिले नव्हते. अनिल देशमुख यांना १२ तासांच्या चौकशीनंतर सोमवारी ईडीने अटक केली कारण ते  ईडीच्या प्रश्नांना उत्तर देण्यास टाळाटाळ करत होते. माजी गृहमंत्री ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजर होण्याची ही पहिलीच वेळ होती. ईडीने यापूर्वी देशमुख यांना चार समन्स पाठवले होते.

न्यायालयाने मंगळवारी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सहा नोव्हेंबरपर्यंत अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कोठडीत पाठवले. मनी लाँड्रिंग प्रकरणात १२ तासांहून अधिक काळ चाललेल्या चौकशीनंतर ईडीने सोमवारी रात्री उशिरा देशमुख यांना अटक केली होती. हे प्रकरण महाराष्ट्र पोलीस विभागातील एका कथित खंडणी टोळीशी संबंधित आहे. याप्रकरणी ईडीने अन्य दोन आरोपींनाही अटक केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed summons former state home minister anil deshmukh son hrishikesh deshmukh abn
First published on: 05-11-2021 at 07:42 IST