सांगली : जिल्ह्याचा वार्षिक जीडीपी ६७ हजार कोटींवरून १ लाख ७७ हजार कोटींवर नेण्यासाठी सांगली पॅटर्नचा ब्रँड तयार करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले.

सांगली पॅटर्न कृषी परिषद निर्यात सक्षमीकरण – फळबागेतून समृद्धीकडे कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित या कार्यशाळेस संचालक मंडळ अपेडाचे सदस्य परशुराम पाटील, प्रकल्प संचालक मॅग्नेट विनायक कोकरे, कोल्हापूर विभाग कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, सरव्यवस्थापक (पणन) कोल्हापूर सुभाष घुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, सहायक व्यवस्थापक अपेडा पांडुरंग बामणे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, की सांगली जिल्ह्यामध्ये अनेक सकारात्मक बाबी होत असून, जिल्ह्याची वाटचाल जिरायतकडून बागायतीकडे सुरू झाली आहे. शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना मार्ग दाखविणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

मार्केटिंगच्या दृष्टीने पणन विभागाचे कामकाज शेतकऱ्यांशी निगडित व्हावे, पणन विभाग प्रत्येक शेतकऱ्याशी जोडला जावा, कृषी आणि पणन एकत्र आल्यास काढणीपश्चात तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढण्यास मदत होईल. द्राक्ष, आंबा, केळी, पेरू, डाळिंब आदी फळपीक उत्पादकांच्या अडचणींचे निराकरण या कार्यशाळेच्या माध्यमातून होईल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

द्राक्ष बागायतदार संघटनेचे दत्ताजी पाटील, डाळिंबउत्पादक संघटनेचे अभिजित चांदणे, केळीउत्पादक संघटनेचे दत्तात्रय मोहिते, आंबाउत्पादक संघटनेचे सचिन नलवडे, पेरूउत्पादक संघटनेचे शिवाजी खिलारे, डॉ. कल्याण बाबर, हेमंत नवरे, अमोल माने, महेश माने, व्यंकटेश इरळे, सौम्यजित विश्वास, किरण डोके, अशोक बाफना आदी मान्यवरांनी कृषिमालाचे ब्रँडिंग, प्रक्रिया, पॅकेजिंग व मार्केटिंग, निर्यातवाढीस चालना मिळण्याच्या अनुषंगाने विविध प्रश्न मांडले.

कार्यशाळेस उपविभागीय अधिकारी मिरज उत्तम दिघे, कृषि उपसंचालक धनाजी पाटील, उपविभागीय अधिकारी कडेगाव रणजित भोसले, उपविभागीय अधिकारी विटा विक्रम बांदल, भारतीय डाळिंब संघ पुणे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे पदाधिकारी, फळउत्पादक शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, निर्यातदार, व्यापारी आदी उपस्थित होते.