वाई : सर्व धर्मीय सण आणि उत्सवांना अधिक मानवकेंद्री स्वरूप देण्याच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भूमिकेला धरून, मागील दहा वर्षे चालणाऱ्या ‘कुर्बानीचा अर्थ नवा’ या अभियाना अंतर्गत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी काल सातारा इथे रक्तदान करून ईद साजरी केली.

या वेळी उपक्रमाची पार्श्वभूमी सांगताना अंनिस कार्यकर्ते मोहसीन शेख म्हणाले की,” ईद उल अजहा हा कुर्बानी देण्याचा सण आहे. आपल्याला प्रिय गोष्ट कुर्बान करणे हा त्याचा खरा अर्थ आहे. बोकडाला बळी देवून हा सण साजरा पेक्षा रक्तदान करून सण साजरा करणे जास्त विधायक पर्याय आहे. मला हा विचार पटल्याने मी गेली दहा वर्षे अंनिस कार्यकर्ता म्हणून ईद हा सण रक्तदान करून साजरा करत आहे. त्याला मुस्लिम धर्मीयांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे ही स्वागतार्ह बाब आहे.

आणखी वाचा-“तुकाराम मुंढेंची बदली आता थेट अमेरिका किंवा चीनला करा”, विजय वडेट्टीवारांची शिंदे सरकारवर टीका!

यावेळी बोलताना अंनिसचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले की , अंनिस फटाकेमुक्त दिवाळी, पर्यावरण पूरक होळी, पर्यावरण पूरक गणपती अशा अनेक सणाना अधिक मानवी चेहरा देण्याच्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना सुरुवातीला विरोध झाला असला तरी आता महाराष्ट्र शासनाने तसेच समाज मनाने देखील हे उपक्रम मोठ्या प्रमाणात स्वीकारले आहेत. त्याच पद्धतीने कुर्बानीचा अर्थ नवा ह्या उपक्रमाला देखील वाढता प्रतिसाद मिळत आहे. हे खूप आश्वासक आहे. पैगंबर शेख सारखे तरुण कार्यकर्ते मुस्लिम सुधारणा मंडळाच्यामार्फत बोकडाची कुर्बानी देण्या ऐवजी आर्थिक कुर्बानी हा उपक्रम राबवत आहे आणि त्याला चांगला पाठिंबा मिळत आहे. हे चांगले आहे.

आणखी वाचा-जितेंद्र आव्हाडांचा आरोप, “भाजपाकडून अजित पवारांना बळीचा बकरा..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. दाभोलकर पुढे म्हणाले की, माणूस हा मिश्रहारी प्राणी असल्याने अंनिस संघटनेचा विरोध हा मांसाहाराला नसून देवाच्या नावाने बळी देणे ह्या संकल्पनेला आहे. आज दोन्ही संघटनांच्या वतीने मिळून २३ जणांनी रक्तदान केले. माऊली ब्लड बँकेचे अजित कुबेर यांनी सर्व रक्तदात्यांचे अभिनंदन केले व आभार मानले. सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असताना झालेल्या या रक्तदानाचा गरजू लोकांना फायदा होईल असे विचार माऊली ब्लड बँकचे डॉ. गिरीश पेंढारकर यांनी व्यक्त केले. यावेळी माऊली रक्तपेढीचे डॉ रमण भट्टड इतरांचे सहकार्य लाभले. उपक्रम यशस्वी होण्यासाठी शंकर कणसे आणि वंदना माने यांनी प्रयत्न केले.