दलित, आदिवासी समाजात कर्मकांड आणि जाती व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करणारे, आंबेडकरी चळवळीचे लढाऊ नेते अ‍ॅड. एकनाथ आवाड (वय ६५)यांचे हैदराबाद येथे सोमवारी सकाळी निधन झाले. आवाड यांना रक्तदाब व हृदयरोगाचा त्रास होत होता. हैदराबाद येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मानवी हक्क अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करत त्यांनी ‘कसेल त्याची जमीन’ हे जनआंदोलन उभारले. मंगळवारी तेलगाव येथील नेल्सन मंडेला वसाहत परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वडवणी तालुक्यातील दुकडेगाव येथे पोतराजाच्या कुटुंबात जन्मलेले अ‍ॅड. एकनाथ आवाड यांनी वडिलांचे केस कापून पोतराज प्रथेवर पहिला घाव घातला. घरातूनच संघर्ष सुरू करून आवाड यांनी पोतराजाच्या प्रथेतून शंभरहून अधिक कुटुंबांची सुटका केली. औरंगाबादमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेताना आंबेडकरी विचारधारेशी त्यांची नाळ जोडली गेली ती कायमची. समाजसेवा पदविका घेतल्यानंतर ठाणे जिल्ह्णाात विवेक पंडित यांच्या विधायक संसद बरोबर मातंग आणि आदिवासी समाजातील कुप्रथांविरोधात त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. काही काळानंतर आवाड यांनी मानवी हक्क अभियानची स्थापना केली. दलितांवरील अन्याय अत्याचाराविरुद्ध धावून जाणारी फळी उभी केल्याने आवाड हे ‘जीजा’ म्हणून सर्वदूर परिचित झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. दादासाहेब क्षीरसागर यांच्यासोबत राज्यात ठिकठिकाणी गायरान जमिनी नियमानुकूल करण्यासाठी लढा उभा करून हजारो कुटुंबांना जमिनी मिळवून दिल्या. २००१ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने वंशभेदविरोधी परिषद घेतली होती. त्यामध्ये समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून एकनाथ आवाड सहभागी झाले होते. त्यांनी आपले संघर्षमय जीवन ‘जग बदल घालूनी घाव’, या आत्मचरित्रातून मांडले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath awad passed away
First published on: 26-05-2015 at 03:02 IST