पक्षाच्या आदेशाचे पालन केल्याचा दावा

जळगाव : भाजपने अखेर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी नाकारून त्यांच्या कन्या अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांना मुक्ताईनगरमधून उमेदवारी जाहीर केली. शुक्रवारी रोहिणी खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी आपण आजवर पक्षाच्या सर्व आदेशांचे तंतोतंत पालन केले असून पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता असल्यामुळेच आपणास उमेदवारी नाकारण्याचा निर्णयही स्वीकारत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.

अ‍ॅड. रोहिणी खडसे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी एकनाथ खडसे यांनी समर्थकांशी संवाद साधला. माझी मुलगी म्हणून नव्हे, तर भाजप उमेदवार म्हणून  रोहिणी खडसे यांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. मी आजवर पक्षाच्या सर्व आदेशांचे तंतोतंत पालन केले. अगदी मंत्रिपद सोडण्याचे आदेशही मानले. आतापर्यंत कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठ पातळीवर कळविल्या असल्या, असेही खडसे यांनी नमूद केले.

एकीकडे वडील समर्थकांना आवाहन करत असताना रोहिणी खडसे यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. याप्रसंगी एकनाथ खडसे यांच्या स्नुषा खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे आदी उपस्थित होते. रोहिणी खडसे या जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षा आहेत. याशिवाय महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ तसेच संत मुक्ताई शुगर अ‍ॅण्ड एनर्जीच्या त्या उपाध्यक्षा आहेत. आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणीचे अध्यक्षपद २०१३ पासून त्यांच्याकडेच आहे.

खडसे यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. आधी मंत्रिपद गेले. आता आमदारकीही गेली. फडणवीस आणि पक्ष नेतृत्वाला आव्हान देण्याचा केलेला प्रयत्न खडसे यांच्या चांगलाच अंगलट आल्याची चर्चा आहे.

भाजपची खेळी यशस्वी

उमेदवारी नाकारण्यात आल्यास खडसे बंडखोरी करण्याची शक्यता होती. कारण त्यांनी आधीच उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण मुलीला उमेदवारी दिल्यास खडसे शांत होतील, हे लक्षात घेऊनच पक्षाने हा पर्याय स्वीकारला. मुलीला उमेदवारी दिल्याने नाराज खडसे यांनी एक पाऊल मागे घेतले.