Eknath Khadse on Pranjal Khewalkar Case : पुणे पोलिसांनी रविवारी (२७ जुलै) पुण्यातील खराडी परिसरातील एका सोसायटीत रेव्ह पार्टीवर धाड टाकल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर व इतर सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान अंमली पदार्थ देखील जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, ही कारवाई संशयास्पद असल्याचं माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ खडसे म्हणाले, “पोलिसांच्या कारभाराविषयी माझ्या मनात काही प्रश्न आहेत. जे वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून मला उपस्थित करायचे आहेत. तिथे पाच-सात जणांची पार्टी चालू होती. तिथं कुठलंही संगीत नाही, नृत्य नाही, कुठलाही गोंधळ नाही. एका घरात पाच-सात जण पार्टी करत होते, त्याला तुम्ही रेव्ह पार्टी कसं काय म्हणता? असं असेल तर देशात, राज्यात कुठेही पाच-सात जण मिळून पार्टी करत असतील तर त्याला रेव्ह पार्टी म्हणणार का? रेव्ह पार्टीची नेमकी व्याख्या काय ती पोलिसांनी स्पष्ट करावी. त्यामुळे रेव्ह पार्टी आयोजित केली म्हणून माझ्या जावयाची बदनामी करण्याचं प्रयोजन काय?”
एकनाथ खडसेंचा पोलिसांवर संताप
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते म्हणाले, “पोलिसांनी जिथे कारवाई केली त्या कारवाईचं व्हिडीओ फूटेज प्रसारमाध्यमांवर दिसतंय. पोलिसांना या गोष्टी सार्वजनिक करण्याचा अधिकार कोणी दिला? एखाद्याच्या खासगी आयुष्यातील घटनांचं चित्रीकरण करून ते जगासमोर आणण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला? पोलिसांनी निव्वळ बदनामीसाठी हे कृत्य केलं आहे का? अशा प्रकारच्या कुठल्याही कारवाईदरम्यान पोलिसांना संशयित आरोपींचा चेहरा दाखवण्याचा अधिकार नाही. महिला असो अथवा पुरुष, पोलीस कोणाचेही चेहरे दाखवता येत नाहीत. मात्र, या कारवाईदरम्यान पोलिसांनी सर्व महिला व पुरुषांचे चेहरे दाखवले. कारवाईत पोलिसांनी बदनामी करण्याचं ध्येय ठेवल्याचं दिसत आहे.”
पोलिसांनी खेवलकरांना साक्षीदार करायला हवं होतं : खडसे
“पोलिसांनी या कारवाईत डॉ. प्राजंल खेवलकर यांना पहिल्या क्रमांकाचा आरोपी का केलंय? त्यांच्याकडे कुठलाही अंमली पदार्थ सापडलेला नाही. त्यांच्यावर याआधी कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेली नाही. तसेच ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाहीत. उलट डॉ. खेवलकर हे वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेलं नाव आहे. पोलिसांनी दावा केला आहे की त्यांना या प्रकरणात एका महिलेच्या मुलीच्या पर्समध्ये २.७ ग्रॅम अंमली पदार्थ सापडले आहेत. मग ती मुलगी पहिल्या क्रमांकाची आरोपी असायला हवी आणि डॉ. खेवलकरांना साक्षीदार करायला हवं होतं, कारण त्यांच्याकडे काहीच सापडलेलं नाही.”
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
एकनाथ खडसे म्हणाले, “डॉ. खेवलकर यांचा वैद्यकीय अहवाल आला असल्याचे काही वृत्तवाहिनींच्या माध्यमातून कळले. इथे एक साधा प्रश्न पडत आहे की मद्य सेवनाच्या चाचणीचा अहवाल इतक्या तात्पर्यतेने येतो, तो माध्यमांमध्ये प्रसिद्ध होतो, मग अंमली पदार्थांच्या चाचणीचा अहवाल येण्यास इतका वेळ का लागत आहे? मागच्या वर्षी पुण्यात जे पोर्शे अपघात प्रकरण झाले होते. त्यात आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा इतिहास या ससून रुग्णालयाला लाभला आहे याची सहज आठवण झाली. त्यामुळे डॉ. खेवलकर यांच्या अंमली पदार्थांच्या सेवनाची चाचणीचा अहवाल तर बदलला जाणार नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे.