राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानकपणे राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शरद पवारांच्या या घोषणेनंतर विविध राजकीय पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. तसेच शरद पवार यांनी निर्णय मागे घेतला नाही, तर पुढचा अध्यक्ष कोण? अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही भाष्य केलं आहे. भुसावळमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – शरद पवार राजीनामा मागे घेणार का? आज अध्यक्ष निवड समितीच्या बैठकीत होणार निर्णय!

काय म्हणाले शरद पवार?

‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले. त्यामुळे संपूर्ण राज्यात व कार्यकर्त्यांमध्ये उलथापालथ झाली आहे. शरद पवार हे एक गुढ व्यक्तिमत्त्व आहे. या व्यक्तिमत्त्वाची उकल अद्याप कोणालाही झालेली नाही. त्यामुळे शरद पवार यांनी राजीनामा का दिला? त्यामागे नेमका काय हेतू आहे? याचे परिणाम नेमके काय होतील? हे आज तरी मला सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली.

पुढे बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या अध्यक्षपादबाबतही भाष्य केलं. शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष राहावे, अशी सर्वांची इच्छा आहे. मात्र, ते आपल्या निर्णयावर ठाम राहिले तर अध्यक्षपदासाठी सुप्रिया सुळे आणि अजित पवार ही दोन नावं पुढे येतात. पण अशी केवळ चर्चा आहे. यासंदर्भातला प्रत्यक्ष निर्णय समिती घेईल. त्यामुळे काही दिवसांतच याबाबतचा निर्णय होईल, असे ते म्हणाले.

हेही वाचा – शिवाजीराव आढळराव पाटलांनी केलेल्या ‘त्या’ विधानावर अमोल कोल्हेंची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; म्हणाले…

शरद पवारांनी दिला राजीनामा

दरम्यान, मंगळवारी शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्ती प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना अचानक आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती. सार्वजनिक जीवनातील १ मे १९६० पासून सुरु झालेला हा प्रवास ६३ वर्षांपासून अवरित सुरू आहे. त्यामुळे इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आता कुठेतरी थांबवण्याचा विचार करणे आवश्यक असून अधिक मोह न करता मी राष्ट्रीय अध्यक्ष पदावर निवृत्त होण्याचा निर्णय घेतो आहे, असे ते म्हणाले होते. मात्र, त्यांच्या या घोषणेनंतर गेल्या दोन दिवसांपासून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेतेमंडळी शरद पवारांची मनधरणी करत आहे.

हेही वाचा – “मणिपुरातील हिंसाचार हे गृहमंत्रालयाचे अपयश”; ठाकरे गटाचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले, “राणा दाम्पत्याला इम्फाळला पाठवून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक

महत्त्वाचं म्हणजे आज अध्यक्ष निवड समितीची वाय. बी. सेंटरमध्ये बैठक होणार असून त्यात शरद पवारांच्या अध्यक्षपदाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे.