कर्नाटक निवडणुकीचा निकाल शनिवारी ( १३ मे ) जाहीर झाला. या निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत १३५ जागा निवडून आल्या आहेत. तर, भाजपाला ६६ जागांवर समाधान मानवं लागलं आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा आपले उमेदवार उभे केले होते. पण, एकही उमेदवार जिंकून आला नाही. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीला डिवचलं होतं.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“शरद पवारांनी कर्नाटकात जागा लढवल्या. मात्र, तिथे त्यांना एक टक्काही मते मिळाली नाहीत. ०.५ टक्क्यांच्या खाली मते राष्ट्रवादीला मिळाली आहेत. मी सांगितलं होतं, यांचा उमेदवार ‘पॅक’ करून परत पाठवा. माझं निपाणीच्या लोकांनी ऐकलं आणि शरद पवारांचा उमेदवार ‘पॅक’ करून परत पाठवला आहे,” असा टोला फडणवीसांनी शनिवारी राष्ट्रवादीला लगावला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.

हेही वाचा : “येत्या तीन महिन्यांत संजय राऊत पुन्हा तुरुंगात जाणार”, नितेश राणेंचा मोठा दावा; ‘या’ गुन्ह्याखाली होणार अटक?

“…मग भाजपाचे ‘पार्सल’ परत पाठवलं म्हणायचं का?”

“दक्षिणेतील अनेक राज्यांत भाजपाला फारसा प्रतिसाद मिळत नाही. मग, अशा ठिकाणी भाजपाचे ‘पार्सल’ परत पाठवलं म्हणायचं का?,” असा टोमणा एकनाथ खडसेंनी फडणवीसांना लगावला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“भाजपाची अनामत रक्कम जप्त झाल्याची शेकडो उदाहरणे”

“भाजपा आणि जनसंघाचा इतिहास पाहिला, तर अनेक वर्षे बऱ्याच राज्यात पक्षाच्या जागा निवडून येत नव्हत्या. आताही दक्षिणेतील राज्यात भाजपाला फारसा प्रतिसाद मिळत नाही. मग, अशा ठिकाणी भाजपाचे ‘पार्सल’ परत पाठवले म्हणायचं का? शेवटी कोणताही राजकीय पक्ष प्रयत्न करत असतो. भाजपाची अनेक ठिकाणी अनामत रक्कम जप्त झाल्याची शेकडो उदाहरणे आहेत,” असेही एकनाथ खडसेंनी म्हटलं.

हेही वाचा : “उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी पहाटेचा शपथविधी”, मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर अंधारेंचा टोला; म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“गिरा तो भी टांग उपर”

“भाजपाची परिस्थिती खूप नाजूक झालेली दिसत आहे. ‘गिरा तो भी टांग उपर’ अशा स्वरूपाचं फडणवीसांचं वक्तव्य आहे. देशात विरोधी पक्ष एकत्र राहिला, तर बऱ्यापैकी यश मिळू शकेल, हा विश्वास वाढत आहे. देशात आपण जे दहा वर्ष चित्र पाहिलं. यापेक्षा वेगळं चित्र पाहायला मिळालं, तर आश्चर्यं वाटायला नको. कर्नाटकच्या विजयानंतर महाविकास आघाडीचे मनोबल वाढलेलं आहे,” असेही एकनाथ खडसेंनी सांगितलं.