मुंब्रा येथील मध्यवर्ती शाखा जमीनदोस्त केल्याच्या कारणावरून ठाकरे आणि शिंदे गटात वाद उफाळून आला आहे. अशातच शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी त्या शाखेला भेट देण्यात मुंब्र्यात आले होते. दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष नरेश मस्के आणि कार्यकर्ते शाखा परिसरात तळ ठोकून बसले होते. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होते. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांनी उद्धव ठाकरेंना शाखेत जाण्यापासून रोखलं.
यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. “मुंब्र्यात एवढे फटाके वाजले की काहींना युटर्न घेऊन परत जावं लागलं,” अशी टीका एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. ते ठाण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.
एकनाथ शिंदे म्हणाले, “मुंब्र्यात काही फुसके बार येऊन गेले. पण, ते वाजलेच नाही. नरेश मस्के आणि कार्यकर्त्यांनी एवढे फटाके वाजवले की युटर्न घेऊन परत जावं लागलं. ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. जे पेरलं तेच उगवलं.”
हेही वाचा : “शाखा पाडली, बॅनर्स फाडले, निवडणुकीत तुमची मस्ती फाडतो”, मुंब्र्यात उद्धव ठाकरे कडाडले
“तुमची मस्ती फाडतो”
शिवसैनिकांना संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी म्हटलं, “सत्तेचा माज आलेल्यांनी बुलडोझरने शिवसेनेची शाखा पाडली. पण, खरा बुलडोझर घेऊन मुंब्र्यातील रस्त्यावर आलो आहे. आमचे बॅनर फाडल्याचे कळले. पण, निवडणुका येऊद्या तुमची मस्ती फाडतो.”
हेही वाचा : “चोरांनी मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारलाय, आता…”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
“पोलिसांना बाजूला सारून समोर या”
“राज्यातील सरकारने पोलिसांना आधी वारकऱ्यांवर, त्यानंतर मराठा आंदोलकांवर हल्ला करायला लावला आणि आता मुंब्य्रात शाखाचोरांचे संरक्षण करायला लावले आहे. मी राज्यातील पोलिसांना दोष देत नसून ते हतबल आहेत, अशी टीका त्यांनी केली. खोके सरकारने आमची शाखा पाडून एक खोका अडकवून ठेवला आहे. आमच्या जागेवर अतिक्रमण केले आहे. तो खोका लवकरात लवकर उचलावा. अन्यथा आम्ही येऊन तो खोका उचलून फेकून देऊ. तुमच्या हिंमत असेल, तर पोलिसांना बाजूला सारून समोर या,” असे आव्हानही उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला दिले आहे.