शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केल्यानंतर ३९ दिवसांनंतर राज्यमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे. राजभवनावरील शपथविधी सोहळ्याच्या पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र या पहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मंत्रिमंडळात असणाऱ्या सदस्यांऐवजी जे मंत्रिमंडळात नाही अशा आमदारांना अच्छे दिवस आल्याचं म्हटलंय. शिंदे सरकारच्या या मंत्रीमंडळ विस्तारावर मिटकरींनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया नोंदवली आहे.

नक्की पाहा >> Photos: ‘एकनाथ कुठं आहे?’, ‘महाशक्ती तुमच्या पुढे गेली शिंदे साहेब’, ‘फडणवीसांसमवेत पहिली रांग अन्…’; दिल्लीतील ‘तो’ फोटो चर्चेत

आज राजभवानमध्ये पार पडलेल्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये एकूण १८ मंत्र्यांनी शपथ घेतली. शिंदे गटाकडून तानाजी सावंत, उदय सामंत, संदीपान भुमरे, दादा भुसे, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, संजय राठोड, गुलाबराव पाटील यांनी शपथ घेतली. तर भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, सुरेश खाडे, राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, रवींद्र चव्हाण, विजयकुमार गावित, मंगलप्रभात लोढा यांना नव्या मंत्रीमंडळात संधी देण्यात आली आहे. याच मंत्रीमंडळ विस्तारासंदर्भात बोलताना मिटकरींनी शिंदे सरकारचा उल्लेख ‘ओढून तोडून स्थापन केलेलं औट घटकेचं सरकार’ असा केलाय.

नक्की वाचा >> “स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे…”; शिंदे-फडणवीस सरकारचं मंत्रीमंडळ पाहून सुप्रिया सुळेंनी नाराजी व्यक्त करत नोंदवली प्रतिक्रिया

“हिंदुत्वासाठी औट घटकेचं ओढूनतोडून स्थापन झालेल्या शिंदे सरकारमधील प्रथम श्रेणी कॅबिनेट मंत्र्यांना कट्टर धर्म रक्षणाच्या शुभेच्छा,” असं मिटकरींनी म्हटलंय. त्याचप्रमाणे याच ट्विटमध्ये त्यांनी, “ज्यांना यात स्थान मिळालं नाही त्यांनी त्यांचे खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिवस’ आलेले आहेत असे समजावे,” असा खोचक टोला लगावला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिंदेंच्या मंत्रिमंडळामधील काही नेत्यांवर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. त्यामध्ये टीईटी परिक्षेतील घोटाळ्यामुळे चर्चेत आलेले आमदार अब्दुल सत्तार यांच्याबरोबरच पूजा चव्हाण प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात राजीनामा द्यावा लागलेले आणि आज पुन्हा मंत्री झालेल्या संजय राठोड यांच्या नावाचा समावेश आहे.