मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सात वेळा दिल्लीवारी आणि तब्बल ३९ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात १८ जणांचा समावेश करण्यात आला. मात्र, मंत्रिमंडळात एकाही महिलेला संधी देण्यात आली नसून, विजयकुमार गावित, संजय राठोड आणि अब्दुल सत्तार या वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांचा समावेश झाल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. संजय राठोड यांच्या समावेशावरुन शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केलं आहे. शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारावरुन ‘सामना’च्या अग्रलेखातून टीका करताना शिवसेनेनं ‘राठोड फडणवीस यांच्या मांडीस मांडी लावून बसतील,’ असं म्हटलंय.

नक्की वाचा >> Photos: “…म्हणून संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश केला”; पूजा चव्हाण प्रकरणावरुन टीकेच्या पार्श्वभूमीवर CM शिंदेंचा खुलासा

बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तारात १८ जणांचा कॅबिनेट दर्जाचे मंत्री म्हणून समावेश करण्यात आला. भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी नऊ जणांना पहिल्या टप्प्यात संधी मिळाली. राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा यांनी पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये शपथ घेतली असून या मंत्र्यांपैकी अनेक मंत्री महाविकास आघाडीत मंत्री असल्याचा उल्लेख करत शिवसेनेनं राठोड यांच्या निवडीवर आक्षेप घेतलाय.

नक्की वाचा >> “संजय राठोडला मंत्रीपद देणं दुर्दैव, तो मंत्री झाला असला तरी…”; भाजपाच्या चित्रा वाघ मंत्रिमंडळ विस्तार सुरु असतानाच संतापल्या

“शिंदे गटाचे जे लोक मंत्री झाले ते महाविकास आघाडीतही मंत्री होतेच. त्यातील राठोड यांच्यावर अनेक प्रकारचे गंभीर आरोप भाजपानेच केले होते. भाजपाच्या आरोपांमुळेच राठोड यांना मंत्रिमंडळातून वगळावे लागले होते. फडणवीस व त्यांच्या लोकांनी पुण्यातील एका महिलेच्या आत्महत्या प्रकरणात राठोड यांना सळो की पळो करून सोडले. आता तेच राठोड फडणवीस यांच्या मांडीस मांडी लावून बसतील. भाजपाच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये टाकून त्यांना स्वच्छ करण्यात आले,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> ४४ हजार २७० कोटींचा मालक आहे शिंदे सरकारमधील ‘हा’ मंत्री; पहिल्यांदाच मंत्रीमंडळामध्ये मिळालं आहे स्थान

“गिरीश महाजनांची मारहाण, खंडणी, अपहार अशी प्रकरणे सीबीआयकडे आहेत. म्हणजे घरच्या घरीच चौकशी सुरू आहे. अब्दुल सत्तार यांच्या कुटुंबियांचे नाव ‘टीईटी’ घोटाळ्यात आले. तरीही शिंदे यांनी सत्तार यांना मंत्री केले. नाही तर सत्तार यांनी शिंदे गटाचाही त्याग करायला मागेपुढे पाहिले नसते,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे. “विजयकुमार गावीत, सुधीर मुनगंटीवार यांच्यावरही घोटाळ्याचे आरोप आहेत. शिंदे यांचा गटच मुळी अनीती व पापाच्या पायावर उभा आहे. भ्रष्टाचार, अनाचाराच्या डबक्यात खुशाल लोळून आमच्या गटात येऊन मंगलमय व्हा,” असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

नक्की पाहा >> Photos: ‘एकनाथ कुठं आहे?’, ‘महाशक्ती तुमच्या पुढे गेली शिंदे साहेब’, ‘फडणवीसांसमवेत पहिली रांग अन्…’; दिल्लीतील ‘तो’ फोटो चर्चेत

“भाजपाच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये घुसळून स्वच्छ करून देऊ. ईडी वगैरेचे भय बाळगायचे कारण नाही. ‘ईडी’च्या कितीही ‘केसेस’ असल्या तरी आमच्याकडे येताच शांत झोप लागेल याची हमी देऊ. गुणकारी औषधांचा लाभ कसा आहे याची खातरजमा हर्षवर्धन पाटलांसारख्या पूर्ण बऱ्या झालेल्या रोग्याकडून करून घ्या, असा एकंदरीत शिंदे-फडणवीस सरकारचा दावा आहे. त्यामुळे महाराष्ट्रास तब्बल चाळीस दिवसांनी एक सरकार लाभले आहे व त्या सरकारकडून महाराष्ट्राला फार काही मिळेल, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. मुळात या सरकारच्या चारित्र्य व प्रतिमेचाच घोटाळा आहे. किचकाने द्रौपदीचा विनयभंग केला, मांडीवर थाप मारून तो वारंवार पापाची भाषा बोलत होता. म्हणून भीमाने किचकाची मांडीच फोडली. फडणवीस यांच्या दोन्ही मांड्यांवर पापाचीच ओझी शिंदे गटाने ठेवली आहेत व हे पाप महाराष्ट्राच्या माथी मारण्याचे कार्य मंत्रिमंडळ विस्ताराने पुढे नेले आहे, ही महाराष्ट्राची बदनामीच आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “पंतप्रधान मोदी म्हणाले महाराष्ट्राला…”; हिंगोलीच्या सभेत मुख्यमंत्री शिंदेंचं नीति आयोगाची बैठक, हजारो कोटींचा उल्लेख करत विधान

“दिल्लीच्या दरबारात महाराष्ट्र मागच्या रांगेत गेलाच आहे. विकासाच्या शर्यतीत तरी तो पुढे राहावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना. क्रांती दिनाचा मुहूर्त शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी निवडला गेला. आता काही लोक बेइमानी, विश्वासघातालाच ‘क्रांती’ म्हणत असतील तर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी आपापल्या दालनात लखोबा लोखंडेच्या तसबिरीच लावाव्यात. महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही. त्यांची औटघटकेची मंत्रिपदे त्यांनाच लखलाभ ठरोत. मंत्रिमंडळाचा पाळणा हलला, पण पाळण्याच्या दोऱ्या कोणाकडे आहेत?” असा प्रश्न शिवसेनेनं विचारलाय.