शिवसेना नेते एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. आता शिवसेना विधीमंडळ पक्षाने ३४ आमदारांच्या स्वाक्षऱ्या असलेला एक ठराव पारित केला आहे, यात बंडखोर नेते एकनाथ शिंदेच विधिमंडळ पक्षप्रमुखपदी कायम असतील, असा ठराव शिवसेनेच्या बंडखोर आमदारांकडून करण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना हा ठराव पाठवण्यात आला आहे.

हेही वाचा- एकनाथ शिंदेंच्या गटासमोर भाजपाची अट? प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ ट्विटने खळबळ

बंडानंतर शिंदेंची विधिमंडळ पक्षप्रमुखपदावरुन हकालपट्टी
२०१९ मध्ये एकनाथ शिंदे यांची एकमताने विधिमंडळ पक्षप्रमुख पदी निवड करण्यात आली होती आणि ते यापुढेही विधिमंडळ पक्षप्रमुख राहतील. शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या मुख्य व्हिपपदी सुनील प्रभू यांची निवड करण्यात आली आहे. ती निवड तात्काळ रद्द करून त्या जागी भरत गोगोवले यांची नियुक्ती करावी, अशी मागणी बंडखोर आमदरांनी केली आहे. शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या मुख्य व्हिपपदी भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आज संध्याकाळी झालेल्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीबाबत सुनील प्रभू यांनी दिलेला आदेश बेकायदेशीर असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले होते. बंड केल्यानंतर शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदावरुन हकालपट्टी केली होती. मात्र, या निर्णयाला बंडखोरांनी आमदारांनी विरोध केला आहे.

हेही वाचा – २०१९च्या पूर्वीपासूनच एकनाथ शिंदे होते भाजपाच्या रडारावर

महाविकास आघाडीसोबत शिवसेनेच्या विचारसरणीशी तडजोड

गेल्या २ वर्षांमध्ये महाविकास आघाडीसोबत शिवसेनेच्या विचारसरणीशी तडजोड करण्यात आली असल्याचे ठरावात म्हणले आहे. तसेच सध्या तुरंगात असलेले अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचा उल्लेख करत महाविकास आघाडी सरकारवर सातत्यानं भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या आमदारांना त्यांच्या मतदार संघातल्या मतदारांच्या टीकेला सामोरं जावं लागत असल्याचा असंतोष बंडखोर आमदारांनी व्यक्त केला आहे. तसेच वैचारिक दृष्ट्या मतभेद असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी केल्यामुळे कार्यकर्त आणि मतदारांमध्ये रोष असल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे.