Eknath Shinde : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असून शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. घरात पाणी शिरल्याने, जनावरे वाहून गेल्याने शेतकर्यांना मोठा फटका बसला आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईतील नेस्को सेंटर येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात राज्यातील शेतकर्यांना सरकारकडून केल्या जाणाऱ्या मदतीवर महत्त्वाचे विधान केले.
महापुरामध्ये बळीराजा कोलमडून गेला आहे. आपण त्याच्या पाठीशी आहोत. सरकार त्याच्या मागे आहे. त्यामुळे अटी-शर्ती बाजूला ठेवून कुठल्याही परिस्थितीत आपण बळीराजाला मदतीचा हात दिला पाहिजे. संकट मोठं आहे. लोकं सांगत होते की अनेक वर्षात एवढा पाऊस आम्ही पाहिला नाही. म्हणून आपण मेळाव्यात फक्त आजूबाजूच्या लोकांना बोलवण्याचा निर्णय घेतला. बाकी सगळे तेथे मदत करत आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
दसऱ्यावर पूराचं सावट आहे. अशा परिस्थितीत आपल्या अन्नदात्याच्या मागे उभं राहण्याचं काम शिवसेना करत आहे. पुरात पाऊस वैऱ्यासारखा कोसळला. म्हणूनच यावेळेस सरकार देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असेही एकनाथ शिंदे गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे आयोजित मेळाव्यात बोलताना म्हणाले म्हणाले.
धीर सोडू नका…
अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेले शेतकरी सरकारकडून मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. ही मदत नक्की कधी मिळणार याबद्दलही एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले. पीडित शेतकऱ्यांना उद्देशून ते म्हणाले की, “माझ्या लाडक्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की, त्यांनी धीर सोडू नका. तुमचे भाऊ इकडे आहेत. टोकाचं पाऊल उचलू नका. तुमचं जीवन जे उद्ध्वस्त झालं आहे त्याला उभारी देण्याचं काम शिवसेना आणि महायुतीचं सरकार केल्याशिवाय राहाणार नाही. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांचे कष्ट, वेदना आम्हाला माहिती आहे. आपल्या पूरग्रस्तांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. मदत दिवाळीच्या आधी दिली जाईल हा एकनाथ शिंदेंचा शब्द आहे,” असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले आहे.
शिंदेंची विरोधकांवर टीका
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणात बोलताना विरोधकांवरही जोरदार टीका केली. ते म्हणाले की, तुम्हाला पंतप्रधानांवर टीका करायचा अधिकार नाही. त्यांनी महराष्ट्राला लाखो कोटींचा निधी दिला आहे. जेव्हा उस उत्पादक शेतकरी संकटात होता तेव्हा, अमित शाह यांनी १० हजार कोटी रुपये टॅक्स माफ केला. यूपीए सरकारने दहा वर्षात फक्त २ लाख कोटी दिले. तर १० वर्षात मोदी सरकारने १० लाख कोटी रुपये दिले.
मगाशी रामदास कदम म्हणाले, तुमच्याकडे तीस वर्षांपासून महापालिका आहे. इतके दिवस ओरबडले. ही माया कुठे गेली? लंडनला? तुम्ही लाडकी बहीण योजना बंद होणार म्हणून खोटे परवता. पण मी सांगतो की, ही योजना कधीही बंद होणार नाही. अडीच वर्षांत येवढे काम केल्यामुळेच महायुतीचे २३२ आमदार विजयी झाले. याचबरोबर पूरग्रस्तांना सर्व निकष बाजूला ठेऊन मदत केली जाणार आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.