शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर सध्या राज्यामध्ये सत्तेत आलेलं शिंदे गट आणि भाजपाचं सरकार हे बेकायदेशी असल्याचा दावा केला. भिवंडीमध्ये आयोजित शिवसेना संवाद यात्रेतील भाषणामध्ये आदित्य यांनी केलेल्या या दाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खोडून काढलं आहे. एकनाथ शिंदे यांनी सध्या राज्यामध्ये सत्तेत असणारं सरकार हे पूर्णपणे कायदेशीर असल्याचं सांगतानाच हे सरकार अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केलाय. एकनाथ शिंदे यांनी आज ज्येष्ठ शिवसेना नेते आणि खासदार गजानन कीर्तीकर यांची गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलं.

नक्की वाचा >> आदित्य ठाकरेंच्या ‘बंडखोर गद्दार’ टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; म्हणाले, “त्यांना काय…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदित्य टीका करताना नेमकं काय म्हणाले?
“४० पेक्षा जास्त आमदारांनी शिवसेनेशी गद्दारी करत भाजपाशी हातमिळवणी केली आणि सरकार स्थापन केले. मात्र, हे सरकार घटनाबाह्य असून ते लवकरच कोसळणार आहे,” असा दावा आदित्य यांनी आपल्या भाषणादरम्यान केला. तसेच, “बंडखोर आमदारांकडून आम्ही उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उठाव केला, बंड केला अशी वाक्ये सतत वापरण्यात येत आहेत मात्र, मुळात हा बंडच नसून गद्दारी आहे आणि ही केवळ राजकीय गद्दारी नाही तर माणूसकीशी केलेली गद्दारी आहे,” अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली.

नक्की वाचा >> “आपणच मुख्यमंत्री आहोत हे एकनाथ शिंदेंना सिद्ध करुन दाखवावं लागेल”

मुख्यमंत्री काय म्हणाले?
याच टीकेचा संदर्भ घेत मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. “हे बेकायदेशीर सरकार आहे हे कोसणार आहे असंही ते (आदित्य ठाकरे) म्हणालेत त्याबद्दल काय सांगाल,” असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी बहुमत असल्याचा दावा केला. “सरकार हे लोकांनी निवडून दिलेलं असतं. बहुमत आमच्याकडे आहे. लोकसभा आणि विधानसभेत दोन तृतीयांश बहुमत आमच्याकडे आहे. विधानसभेमध्ये आमच्या ५० लोकांना अध्यक्षांनी मान्यता दिलीय,” असं शिंदे म्हणाले.

नक्की वाचा >> शिंदे गटाकडून शरद पवार, अजित पवारांवर का टीका केली जातेय?; रोहित पवार उत्तर देताना म्हणाले, “त्यांच्यावर खापर फोडलं तर…”

सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरु असणाऱ्या सुनावणीचाही संदर्भ एकनाथ शिंदे यांनी यावेळेस बोलताना दिला. “हा वाद न्यायालयात असून न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. हे सरकार बेकायदेशीर आहे ते बरखास्त करा अशी विरोधकांची मागणी होती. अध्यक्षांची निवड, सरकारची स्थापना बेकायदेशीर असून त्याला स्थगिती द्यावी अशी त्यांची मागणी होती. विश्वासदर्शक ठरावाला स्थगिती द्या असंही ते म्हणाले होते. मात्र न्यायालयाने कशालाच स्थगिती दिलेली नाही. म्हणूनच आम्हाला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे,” असंही मुख्यमंत्री म्हणाले.

नक्की पाहा >> Photos: “उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या आदेशानेच पवारांवर पातळी सोडून टीका”; बापाचा उल्लेख करत अजित पवारांनी इशारा दिलेल्या नेत्याचा गौप्यस्फोट

अडीच वर्ष पूर्ण करणार
“ज्यांना स्वत:चं समाधान करुन घ्यायचंय त्यांना ते करु द्या पण हे सरकार कायदेशीर असून घटनेनुसार ते बनवलेलं आहे. हे सरकार कायदेशीर आहे. घटनेच्या तरतूदीनुसार जे जे करायला हवं होतं ते आम्ही सगळं केलंय. हे सरकार पूर्ण बहुमताचं सरकार असून शिवसेना भाजपा युतीचं सरकार आहे. अडीच वर्ष कालावधी पूर्ण करेलच पुढच्या निवडणुका देखील हे सरकार जिंकेल,” असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde on aditya thackeray comment saying shinde group and bjp government is illegal scsg
First published on: 21-07-2022 at 17:14 IST